
वाशी — संघटित नसलेल्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत आपला मुजोरपणा बीडसह धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांनी दाखवला. यामध्ये पोलिसांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेत. शेतकऱ्यावर अत्याचार केले. इंग्रज, मोगलाई असल्यासारखं वातावरण जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, पोलीस अधीक्षक, यांनी निर्माण केलं. लोकशाहीची ऐसी तैसी करताना शेतकऱ्यांचा विचार केला नाही. त्यांच्या घरावर वरवंटा फिरवताना कुठलंच वैषम्य वाटलं नाही.पण शेतकरी संघटित झाला तर काय होतं याच उदाहरण वाशीच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं.
रेन्यू पाॅवर कंपनीच्या पवनचक्कीच्या तुटलेल्या टॉवरचे काम करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काम करण्यास विरोध करीत बुधवारी 15 ऑक्टोबर दुपारी तीन वाजल्यापासून ते गुरुवारी सायंकाळी सातपर्यंत म्हणजेच तब्बल 28 तास वाहनासह एकाच जागेवर शेतकऱ्यांनी थांबविल्याचा प्रकार सारोळा (मां ) येथे घडला.
तारांचे प्रति मिटर 22 हजार रुपयेप्रमाणे, तर पवनचक्कीच्या प्रती टॉवर 17 लाख रुपये देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.याबाबत मिळालेली माहिती अशी, की सारोळा ( मा.) तसेच परिसरातील काही गावांत रेन्यू पॉवर कंपनीने पवनचक्कीच्या टॉवरची तसेच इतर आवश्यक कामे केलेली आहे.
मात्र मिळालेला मोबदला अत्यल्प असून, तारांसाठी प्रतिमीटर 22 हजार रुपये तर प्रति टॉवर 17 लाख रुपये संबंधित कंपनीने देण्यासाठी मागील काही दिवसांपासून शेतकरी व कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे.
बुधवारी सारोळा ( मां.)येथील एका टॉवरच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी संबंधित कंपनीचे अधिकारी गेले होते. दुरुस्तीच्या कामासाठी अधिकारी आल्याची माहिती मिळाल्यानंतर सुमारे 150 ते 200 शेतकऱ्यांनी एकत्र येत कामासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काम करण्यास विरोध केला.
सोबतच आमचा मोबदला मिळाल्याशिवाय येथून जायचेही नाही असा आक्रमक पवित्रा घेऊन मागील जवळपास 28 तासांपासून चार अधिकाऱ्यांना थांबवून ठेवले. तसेच एक बुलेरो, एक स्कार्पिओ व दोन जेसीबी मशिनसह एकाच जागेवर थांबवले
जेवण, नाश्त्याची शेतकऱ्यांनी केली व्यवस्था:
गुरुवारी सायंकाळी सातपर्यंतही शेतकरी व कंपनीमध्ये झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने शेतकरी व अधिकारी घटनास्थळावरच होते. दरम्यान, बुधवारी रात्री शेतकऱ्यांनी खिचडी बनवत अधिकाऱ्यांसाठी जेवाणाची, तसेच गुरुवारी सकाळी नाश्त्याची सोय केली होती.

