Saturday, December 13, 2025

वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येणार? निर्दोष असल्याचा अर्ज केला न्यायालयात दाखल

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटल्यात महत्त्वाची घडामोड घडली आहे. आज  मकोका न्यायालयात झालेल्या दुसऱ्या सुनावणीत मुख्य आरोपी वाल्मिक कराडने मोठा दावा करत, आपण निर्दोष असल्याचा अर्ज न्यायालयात सादर केला त्यामुळे खळबळ माजली आहे.

वाल्मिक कराडसह महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे यांना या प्रकरणात अटक झाली आहे, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, काही गोपनीय साक्षीदारांच्याही जबाबांची नोंद झाली आहे.

आज कोर्टात वाल्मिक कराडने अर्ज सादर करत सांगितलं की, ‘माझ्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. खंडणी मागितल्याचा आरोपही सिद्ध झालेला नाही. त्यामुळे मला या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावं.’ त्याच्या अर्जावर पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे. त्या दिवशी सरकारी पक्ष आपली बाजू मांडणार आहे.

सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांनी युक्तिवाद केला. सुनावणीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आज आरोपी वाल्मिक कराडने काही कागदपत्रांची जंत्री मागितली होती, ती न्यायालयात सादर करण्यात आली आहे. त्याने पुन्हा एकदा दोषमुक्ततेची मागणी केली आहे.’

विशेष म्हणजे, न्यायालयात संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सादर करण्यात आला आहे. तसेच, वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्यासाठी मोक्का कायद्यानुसार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या खटल्यात आरोपींविरोधात अजूनही आरोप निश्चित झालेले नाहीत, अशी माहिती अॅड. निकम यांनी दिली.

या प्रकरणाच्या पुढील सुनावणीत आरोप निश्चिती आणि तपास यंत्रणांचे सादरीकरण यावरून या खटल्याला नवे वळण मिळू शकते. आरोपींच्या मुक्ततेबाबतचा निर्णय २४ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles