बीड — जिल्हा न्यायालय परिसरात ऍड. राम डोंगरे यांना मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी घडला होता. वकील संघाने आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील आरोपी राधाकिसन करपे याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राधाकिसन करपे याने काही महिलांना सोबत घेऊन येत एड. राम डोंगरे यांना मारहाण केली. या प्रकरणाची तक्रार वकील संघाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. मात्र आरोपीचे पोलिसांशी असलेले हितसंबंधाच्या कारणावरून गुन्हा नोंद करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती. या प्रकरणात वकील संघाने एकजूट दाखवत न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणार नसल्याचे जाहीर करून न्यायालयाच्या पायऱ्यावर बसून बुधवारी आंदोलन केले. त्यानंत मोर्चा शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील तक्रार करण्यात आली. सगळीकडून दबाव वाढल्यानंतर पोलीस यंत्रणा तळ्यावर आली 27 तासानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी राधाकिसन करपे याला अटक करून आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे आजही वकील संघाने न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नव्हता दरम्यान पाच वाजता हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी वकिलांना तक्रार द्यायला गेले असताना तुमच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची धमकी दिली होती. या अनुषंगाने पोलिसांनी एड. राम डोंगरे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलाच तर पुन्हा अनिश्चित काळासाठी वकील संघ काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा वकील संघाने दिला आहे.




