बीड — जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देणारे धनंजय गुंदेकर यांना आमच्या गावातले लोकांचे प्रश्न का सोडवतो आमच्या गावात का येतो असे प्रश्न विचारून पंचायत समिती कार्यालयात “मौज”चा सरपंच संदीप डावकर याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. शासकीय कार्यालयात सुद्धा अशा घटना घडत असल्याने बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून धनंजय गुंदेकर काम पाहतात. सोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नाविरोधात जनजागृतीचं काम देखील ते सातत्याने करत आहेत. मात्र त्याच्या याच कामामुळे झारीतले शुक्राचार्य बेचैन असल्याच पाहायला मिळत आहे. धनंजय गुंदेकर हे लोकांचे प्रश्न घेऊन पंचायत समितीत गेले असता त्या ठिकाणी “मौज” गावचे सरपंच संदीप डावकर हा देखील तिथेच होता. धनंजय गुंदेकर यांना तू आमच्या गावात का येतोस? लोकांचे प्रश्न का सोडवतोस? असा जाब विचारून मारहाण करण्यास सुरुवात केली. गुंदेकर यांना मारहाण होत असताना तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी डावकर याला आवरण्याचा प्रयत्न केला. सोबतच घटनेचा व्हिडिओ काढून समाज माध्यमावर देखील व्हायरल केला. या घटनेमुळे खळबळ माजली असून बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुंड प्रवृत्तीची लोक बाहेरच नाही तर शासकीय कार्यालयात देखील कायद्याचा धाक नसल्यामुळे मारहाण करत असल्याचं चित्र पाहायला मिळू लागला आहे. याप्रकरणी धनंजय गुंदेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.

