माजलगाव — वाळूचे टेंडर होऊन चार दिवसही होत नाही तोच वाहने सुरळीत चालू देण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच घेताना खाजगी इसमासह जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर पोलीस अधीक्षकांनी शहर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना नियंत्रण कक्षात हलवले आहे.
माजलगाव पोलिसांची वाळू वाहतुकीत हप्तेखोरी सुरू झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने समोर आले. माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल कदम याने एका तक्रारदाराकडे वाळू वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम खासगी इसम तात्यासाहेब आर्डे याच्यामार्फत स्वीकारली जाणार होती. जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या पथकाने बुधवारी माजलगाव बायपास रोडवरील लेंडाळ हॉस्पिटलसमोर सापळा रचला. यावेळी अमोल कदम याच्या सांगण्यावरून आर्डे याने २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच घेताच पथकाने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ माजली.दरम्यान लाचखोरी चे प्रकरण उघडकीस येताच पोलीस अधीक्षक नवनीत प्राबत यांनी तत्काळ कारवाईचे आदेश देत. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची माजलगाव शहर ठाण्यातून नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली आहे. पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्याकडे माजलगाव शहर पोलीस ठाण्याचा नवीन पदभार सोपवण्यात आला आहे.

