शिरूर (का) — तालुक्यातील रायमोह येथे रविवारी घडलेल्या घटनेने
खळबळ माजली आहे. अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर एका विद्यार्थ्याला पाच ते सहा विद्यार्थ्यांच्या टोळक्याने घेरून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
ही मारहाण दोन दिवसांपूर्वी घडल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी विद्यार्थी पीडित विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, शाळेच्या गेटबाहेरच अशा प्रकारचे हल्ले होत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेत सहभागी विद्यार्थी हे जालंदर विद्यालय, रायमोह येथील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप उघड झालेलं नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे या प्रकरणी अद्याप शिरूर कासार पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार वा गुन्हा दाखल केलेला नाही. सतत घडणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे प्रशासन आणि पोलिसांचा धाक कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून तरुणांच्या गटागटातले वाद, शाळा-कॉलेज परिसरातील हाणामाऱ्या आणि रस्त्यावरची गुंडगिरी वाढल्याचं दिसून येत आहे. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यावर झालेला हा हल्ला सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दाखवून देतो. दरम्यान, पालकांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळा परिसरात सुरक्षा वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. या प्रकारावर पोलिसांकडून काय पावलं उचलली जातील आणि दोषींवर कोणती कारवाई केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

