केज — महिलांच सक्षमीकरण व्हावं यासाठी गावोगाव बचत गटाची संकल्पना राबविण्यात आली.याच बचत गटांना अल्प व्याजदराने कर्ज देणाऱ्या एका फायनान्स कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याने महिला बचत गटांकडून वसूल केलेली कर्जाच्या रक्कम हडपल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. 79 महिलांकडून तब्बल 16 लाखांपेक्षा अधिकची रक्कम वसूल केली मात्र ती कंपनीच्या खात्यावर जमा केलीच नाही.
केज येथील भारत फायनान्शियल इनक्ल्यूजन लि. या कंपनीच्या शाखेत अरबाज रशीदखाँ पठाण वय 27 वर्ष, रा. अजीजपुरा, केज हा फिल्ड ऑफिसर म्हणून काम करत होता.त्याने 23 ऑगस्ट2023 ते 3 मे 2024 या कालावधीत केज तालुक्यातील महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाची परतफेड म्हणून 79 महिलांकडून हप्त्यापोटी 16 लाख 9 हजार 863 एवढी रक्कम गोळा केली. मात्र, स्वतःकडे जमा करून घेतलेली रक्कम अरबाज पठाण याने कंपनीच्या खात्यावर जमाच केली नाही. या रकमेवर अरबाजने डल्ला मारल्याचे
फायनान्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
महिला बचत गट प्रामाणिकपणे वेळेवर हप्त्यांची परतफेड करत असताना, अरबाज पठाणने मात्र या पैशांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केली. केज येथील कंपनीचे शाखाधिकारी श्रीहरी मुळे यांनी बुधवारी 29 ऑक्टोबर रोजी याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून, फिल्ड ऑफिसर अरबाज रशीदखाँ पठाण याच्या विरुद्ध फसवणुकीचा कलम 406, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

