बीड — विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी एकाकी लढा दिला. त्यात विजय देखील मिळवला. मात्र त्यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीसागर यांनी त्यांच्यापासून चार हात लांब रहात चुलत भाऊ योगेश क्षीरसागर यांना मदत केली.त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.हेच हेमंत क्षीरसागर आता भाजपमध्ये जाऊन काय दिवे लावणार? असा प्रश्न राजकीय विश्लेषकांकडून विचारला जात आहे.
संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात वडील रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, चुलते जयदत्त क्षीरसागर यांनी एकत्रित मोट बांधत योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी आपली ताकद विधानसभेत उभी केली. या एकाकी लढाईत संदीप क्षीरसागर यांनी विजय अक्षरशः खेचून आणला. बीडची राजकारणाची समीकरणं आता पूर्वीची राहिली नाहीत हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं. त्या उलट योगेश क्षीरसागर यांनी कुटुंबीयाची मोट बांधत भक्कम पाठिंबा या निवडणुकीत मिळवला. हेमंत क्षीरसागर यांनी देखील जी काही थोडीफार ताकद होती ती पणाला लावण्याचे काम केलं. मात्र तरीही बदललेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे पराभव वाट्याला आला गेला.सामाजिक विजनवासातून हेमंत क्षीरसागर यांनी थेट आता नगरपालिका निवडणुकीत भाजपमधून मैदानात उतरायचा निर्णय घेतला. बीडमध्ये भाजपची परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. योगेश क्षीरसागर असो की संदीप क्षीरसागर या दोघांना जितका इच्छुक उमेदवारांचा प्रतिसाद मिळत आहे. तशी स्थिती भाजपची नसल्याचं सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत मागील पंचवार्षिक काळात बीड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राहिलेले हेमंत क्षीरसागर पुन्हा भाजपमधून कितपत उभारी घेऊ शकतील याबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. हेमंत क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाने मात्र गेल्या चाळीस वर्षापासून नगरपालिकेत एक हाती सत्ताधीश राहिलेल्या क्षीरसागर घराण्यामध्ये पडलेली ही फुट संदीप क्षीरसागरंपेक्षा योगेश क्षीरसागर यांना नुकसानकारक ठरेल असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

