Sunday, December 14, 2025

बीड अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एस आय टी चौकशीची धनंजय मुंडेंची मागणी

बीड —  उमाकिरण शैक्षणिक संकुलात घडलेला प्रकार दुर्दैवी व संतापजनक आहे. यातील आरोपी विजय पवारला राजकीय बळ आहे, बीडचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या आश्रयाने व वरदहस्ताने या लोकांची इथपर्यंत मजल गेली आहे. या प्रकरणी व्यवस्थित तपास होऊन याधीही असे गुन्हे या लोकांनी केले आहेत का, याची सविस्तर चौकशी होणे अपेक्षित आहे, म्हणून आपण या प्रकरणी एस आय टी चौकशीची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याचे माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी आज बीड येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू होता, त्या अल्पवयीन भगिनी ने जी अत्याचार सहन केला, त्याची पीडा ती स्वतः व तिचे पालकच समजू शकतात.मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सोबत होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यांचे संबंध नेमके कशाचे आहेत? हे संबंध आर्थिक आहेत की आणखी काही असा घणाघात आ.धनंजय मुंडे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची महिला आयपीएस अधिकार्‍यामार्फत एसआयटी नेमून चौकशी केली जावी असेही आ.धनंजय मुंडे म्हणाले.

बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आ.धनंजय मुंडे यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. उमाकिरण मध्ये एक प्रकार समोर आलाय मात्र अशा अनेक घटना घडलेल्या असाव्यात असा संशय असल्याचे आ.मुंडे म्हणाले. कमी शुल्काचे आमिश दाखवून विद्यार्थ्यांना वाममार्गाला लावण्याचा प्रकार विजय पवार व त्याच्या सहकार्याच्या माध्यमातून होत होता असा दावाही आ.धनंजय मुंडे यांनी केला आहे.

आरोपी विजय पवार, प्रशांत खटोकर यांना हे सर्व करता आले त्यामागे त्याला राजकीय आश्रय होता. गुन्हा दाखल झाला त्या दिवसाचे दोन आरोपी आणि त्या पाठबळ देणार्यांचे सीडीआर काढावेत असे आव्हान देखील आ.धनंजय मुंडे यांनी पोलीस प्रशासनाला दिले. पोलीस ज्या पद्धतीने हा तपास करत आहेत त्या पद्धतीने आरोपीला शिक्षा होईल असे वाटत नाही त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महिला आयपीएस अधिकार्‍यामार्फत एसआयटी गठीत करून व्हावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे व दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत असेही आ.मुंडे म्हणाले.

तत्पूर्वी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत तसेच या प्रकरणात नियुक्त तपास अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून सुरू असलेल्या तपासाची चौकशी केली.

अशा नीच वृत्तीच्या लोकांनी असे किती गुन्हे याआधी केलेत तेही उघड होऊन यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना फी वसुली सह सुरक्षेच्या दृष्टीने शासनाकडून एक संहिता लागू असावी, याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, फारुक पटेल, ॲड. गोविंद फड, दादासाहेब मुंडे, भागवत तावरे, यांसह याप्रकरणी आंदोलन पुकारलेले पालक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles