बीड — शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या सहयोगनगर परिसरारतील गणपती मंदिराजवळ एका गल्लीत स्क्रॅप गोडाऊनला आज सकाळी अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने आक्राळविक्राळ रुप धारण केल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बीड नगरपालिकेकडे अग्निशामक दलाची गाडी नसल्याने आग विझविण्यासाठी नागरिकांना खासगी टँकरसह स्थानिक बोअरवेलमधून पाणी उपसावा लागला. तब्बल एका तासाच्या प्रयत्नानंतर सदरील आग आटोक्यात आली.
बीड न. प.अग्निशामक दलाकडे चार अग्निशामक गाड्या आहेत त्या तात्काळ दुरुस्त करून सेवेत दाखल करण्याच्या सूचना आ. विजयराजे पंडित पालिका प्रशासनाला यावेळी दिल्या.जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घेण्याचा निर्णय घेतलेला असून त्या लवकरच बीडकरांच्या सेवेत दाखल होतील असे ही आ. पंडित यांनी सांगितले.
अग्निशामक दलाचे बंब उपलब्ध नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर पहावयास मिळाला. शहरात एखादी मोठी आग लागली तर ती विझवायची कशी ? असा प्रश्नही या वेळी उपस्थित झाला. या आगीत मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
बीड शहरातल्या सहयोगनगर परिसरात गणपती मंदिराजवळ एका गल्लीत अग्रवाल यांचे स्क्रॅप गोडाऊन आहे. आज या गोडाऊनला अचानक आग लागली. बघता बघता आगीने मोठे स्वरुप धारण केले. सदरचं गोडाऊन हे मध्यवर्ती वस्तीत असल्याने आजुबाजुच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरले. त्यामुळे काही काळ या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील नागरिकांनी आपल्याकडील आहे त्या भांड्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. खासगी टँकरही बोलवण्यात आलं. स्थानिक नागरिकांच्या घरातले बोअर चालू करून ही आग विझविण्याचा प्रयत्न झाला. अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

