केज — मोठ्या बहिणी सोबत ऊस तोडणी साठी आलेल्या बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील एका गावातून उघडकीस आली आहे.याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
अत्याचार पीडित बालिकेचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. तिचे वडील कर्नाटकात ऊस तोडणीसाठी गेले आहेत, तर आईची मानसिक स्थिती ठीक नाही.ती नातेवाइकांकडे असते. अशा भीषण परिस्थितीत 6 वीच्या वर्गात शिकणारी ही पीडित बालिका आपल्या ऊसतोड मजूर बहिणीसोबत केज भागात आली होती. तिची मोठी बहीण आणि दाजी धारूर तालुक्यातील एका मुकादमाकडून उचल घेऊन केजमधील एका गावात ऊसतोडणीसाठी आले होते. सोमवारी रात्री सर्व मजूर शेतात उसाचे ट्रॅक्टर भरण्यासाठी गेले होते.यावेळी आरोपी लक्ष्मण ऊर्फ सागर निवृत्ती वाघमारे वय 34 वर्ष, रा. सोमनाथ बोरगाव, ता. अंबाजोगाई हा देखील तिथेच होता. दरम्यान सहा वर्षांची बालिका नैसर्गिक विधीसाठी जात असताना, नराधम लक्ष्मणने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. ही घटना माहिती होताच पोलिसांत धाव घेण्यात आली. गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेला होता. मात्र, युसूफवडगाव पोलिसांनी आरोपीला कळंब बसस्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पकडले. बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात पाॅक्सोसह इतर कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.

