बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची विधानभवनात केली मागणी
गेवराई — मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात तसेच धनगर समाजालाही एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी आज विधानभवनात केली. अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना आ. विजयसिंह पंडित यांनी बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवला. गेल्या अनेक दिवसांपासून बंजारा आणि धगनर समाज एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी संघर्ष करत असून सरकारने त्यांच्या आरक्षणाचा तिढा सोडवून बंजारा (लमाण) समाजाला आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची आग्रही मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी विधानभवनात केली.
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात गेवराई विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांनी बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवला. विधानभवनात अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, मराठवाडा हा प्रदेश सन १९४८ पर्यंत निजामशासीत हैद्राबाद राज्याचा भाग होता. हैद्राबाद गॅझेटियर सन १९२० मध्ये लांबडा/बंजारा (सुगळी) समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केलेला आहे. बंजारा (लमाण) समाज मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे, हैद्राबाद गॅझेटियरच्या पुराव्यानुसार बंजारा समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजात आहे. तथापि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर सन १९५६ नंतर या समाजाला ओबीसी/एनटीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले. परंतु तेलंगणा व आंध्र प्रदेशात याच गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे. संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने मराठा समाज बांधवांना हैद्राबाद गैझेटियर लागू केले त्यानुसार त्याचा आधार घेऊन मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात सामिल करून त्यांना या प्रवर्गातील आरक्षणाची लाभ देण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी केली.
आ. विजयसिंह पंडित यांनी धनगर समाजाचाही आरक्षणाचा मुद्या विधानभवनात लावून धरला. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गात आरक्षणाची मागणी होत आहे. धनगर समाजाचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक मागासलेपण लक्षात घेता धनगर समाजाची मागणी योग्य आहे. धनगर समाजाचा इतिहास, लोकजीवन आणि परंपरा याचा विचार केल्यास धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. समाजाच्या जीवनमानानुसार धनगड हा समुदाय यावर्षीपासून अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यातील त्याच बरोबर बीड जिल्ह्यातील आणि माझ्या गेवराई विधानसभा मतदार संघातील धनगर समाजाची आग्रही मागणी लक्षात घेता धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्यावे. त्यामुळे धनगर समाजाला शिक्षण, नोकरी यांसह इतर आरक्षणाचे लाभ मिळतील आणि त्यांच्या विकासाचा मार्ग सुकर होणार आहे असेही आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी सांगितले.
आ. विजयसिंह पंडित यांनी विधानभवनात बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे बंजारा आणि धनगर समाजामधून आ. विजयसिंह पंडित यांचे आभार मानले जात आहेत.



