बीड — पवन ऊर्जा कंपन्यांनी व त्यांच्या गुंडांनी बालाघाटावर नंगानाच सुरू केलेला असल्याने सर्वसामान्य शेतकरी मात्र हैराण झाला आहे. कंपन्यांचे गुंड शेतकऱ्यांच्या शेतात घुसून अनाधिकृत रीतीने पोल उभे करून पिकांची नासधूस करू लागले आहेत. याप्रकरणी ओ-टू पाॅवर कंपनी विरोधात घारगाव येथील शेतकरी ओंकार इंद्रभूषण गिरी यांनी एस पी सह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
गेल्या दीड वर्षापासून पवनचक्की कंपन्यांनी बीड जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. शेतकऱ्यांवर दादागिरी करण्यासाठी स्वतःचे गुंड कंपन्यांनी पाळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. कोणाच्याही शेतात अनाधिकृतपणे घुसायचे शेतकऱ्याची संमती न घेता अनाधिकृत रीत्या वीज वहनासाठी पोल उभे करायचे एखाद्या शेतकऱ्याने काम अडवलंच तर दादागिरी करून शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरवायची एवढा एकमेव उपक्रम कंपन्यांनी सध्या सुरू केला आहे. घारगाव शिवारात देखील हाच प्रकार सर्रास सुरू आहे. गट क्रमांक 60 मध्ये पवनचक्की उभारली आहे. येथे निर्मिती झालेली वीज वहनासाठी शेतकऱ्यांच्या शेतात पोल उभे करण्यात आले आहेत. लोखंडी पोल घेऊन जाण्यासाठी उभ्या पिकांची वाहन घालून नासधूस करायची, बांधावर असलेली फळझाडं तोडून टाकायची. पुन्हा दादागिरी करायची असा प्रकार ओंकार इंद्रभूषण गिरी या शेतकऱ्याच्या शेतात केला गट नंबर 61मधील पूर्वीचे डोक्या एवढाले उंचीचे बांध कंपनीने निस्तनाभूत केले. 14 फळझाड उपटून काढली. शेतात आस्ताव्यस्तपणे पोल टाकून दिले. या संदर्भात कंपनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता तुला काय करायचे ते कर असं म्हणून दादागिरी करत दहशतीचे वातावरण निर्माण केले. नुसते दहशतीचे वातावरण निर्माण केले नाही तर स्थानिक पोलीस देखील कंपनीच्या गुंडांनाच संरक्षण देण्याचे काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कंपनी गुंडांनी शेतकरी इतका दहशतीत आणला की जीवाला धोका निर्माण होईल या भीतीपोटी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना ओंकार गिरी यांनी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. कामाला माझा विरोध नाही मात्र योग्य तो मोबदला देण्यात यावा. मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे झालेली नुकसान भरून द्यावी तसेच नुकसानीला जबाबदार असणाऱ्या कंपनी अधिकारी कर्मचारी तसेच कंपनी गुंडांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील ओंकार गिरी यांनी केली आहे.

