Home राज्य फलटण:मृत महिला डॉक्टरचं बदनेकडून शारीरिक शोषण, हातावरील अक्षरही तिचेच; फडणवीसांची माहिती

फलटण:मृत महिला डॉक्टरचं बदनेकडून शारीरिक शोषण, हातावरील अक्षरही तिचेच; फडणवीसांची माहिती

0
30

नागपूर — डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी
प्रशांत बनकर आणि निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदणे यांनी फसवणूक केली आणि तिचे अनेकवेळा शोषण केलं असं सध्या त्यांच्या हॉटस्अप चॅट आणि इतर पुराव्यातून आढळले आहे, याची महिला आयपीएस अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरु आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिली.
नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा सभागृहात गाजला. विरोधकांकडून या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिली.
फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर आपण तपासासाठी एसआयटी नियुक्त केली. यासंदर्भात न्यायालयीन चौकशीही सुरू असून फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, महिला डॉक्टरने हातावर जे लिहिलं आहे ते तिचंच हस्ताक्षर असल्याचं निष्पन्न झालं आहे,” असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहीत जीवन संपवल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनादरम्यान या घटनेच्या तपासाबाबत माहिती दिली आहे. “या प्रकरणात पोलीस अधिकारी बदने याने डॉक्टर तरुणीची फसवणूक केली आणि तिचे शारीरिक शोषण केलं. लग्नाचं आमिष दाखवून नंतर त्याने वेगळी भूमिका घेतली,” असं तपासात समोर आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

या प्रकरणाच्या तपासविषयी माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “आत्महत्येमागे बदनेने केलेली फसवणूक आणि त्या परिस्थितीचा फायदा घेत दुसऱ्या आरोपीनेही फसवणूक केली. या दोघांची नावे लिहून तिने आत्महत्या केली. फॉरेन्सिक अहवालानुसार, गळफास लावून आत्महत्या झाली असून, हातावरचे अक्षर महिलेचेच आहे. तपास अजून संपलेला नाही आणि चार्जशीट लवकरच दाखल होईल. समांतरपणे अनेक गोष्टींची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्तींची नेमणूक केली आहे. महिला IPS अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास सुरू आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, “डिजिटल आणि तांत्रिक पुरावेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. व्हॉट्सॲप चॅट मिळाले आहेत. शेवटच्या दिवशी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये आल्या, रूममध्ये गेल्या याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहेत. कोण आले, कोण गेले याचीही माहिती आहे. नवीन कायद्यानुसार फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. काही गोष्टींची पडताळणी केली जात आहे. ६० दिवसांत चार्जशीट दाखल केली जाते, तीदेखील अंतिम टप्प्यात आहे. आरोपींव्यतिरिक्त अजून कोणी या प्रकरणात सहभागी आहे का, याची माहिती मिळवण्यासाठी न्यायालयीन चौकशी सुरू आहे,” अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here