पुणे — राज्यातील तापमान सतत घसरत असून थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विशेषतः 16 नोव्हेंबर रोजी शीतलहरीचा इशारा दिल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढणार आहे. आज मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना अधिकृतपणे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रकोप अधिक जाणवणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान साधारण 29 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. या सर्व भागांमध्ये आकाश पूर्णपणे स्वच्छ राहणार असून, दिवसभर गारवा टिकून राहील.
हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांनाही कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी तापमानात झपाट्याने घट होऊन थंडीसह कोरडे वातावरण जाणवेल. पुढील तीन दिवस या भागातील तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हाडं गोठवणारी थंडी वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी रात्री बाहेर पडताना आणि सकाळी लवकर बाहेर जाताना विशेष काळजी घ्यावी.
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही हवामान कोरडेच राहणार आहे. लातूरमध्ये दिवसाचे तापमान साधारण 28 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, तर रात्रीचे तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरू शकते. या भागांतही तापमानातील घट कायम राहिल्यामुळे थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
एकूण पाहता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या सहा जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून शीतलहरीचा इशाराही दिला आहे. ही परिस्थिती किमान पुढील 48 तास कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

