बीड — जिद्द चिकाटी परिश्रमाच्या जोरावर पालात राहणाऱ्या आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील तरुणाने बहरिन येथे झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत 60 किलो गटात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. सुवर्ण वेध घेणाऱ्या या मुलाचं नाव सनी फुलमाळी असं आहे. त्याच्या जीवन संघर्षाची कहाणीही आशियाई युवा स्पर्धेत झालेल्या कुस्ती इतकीच रोमहर्षक आहे.
सनी फुलमाळीचा परिवार आष्टीच्या पाटसरा गावातून पोट भरण्यासाठी पुणे या ठिकाणी गेला. गेल्या 15 वर्षापासून लोहगाव परिसरात एका झोपडीत वास्तव्य सुरू झालं. सनीच्या वडील सुभाष फुलमाळी यांना नंदीबैल घेऊन भविष्य सांगाव लागतं,तर आईला सुई-दाभण विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो.अशी खडतर परिस्थिती असतानाही सनीने ध्येय निश्चित करत परिस्थिती पुढे हार मानली नाही. आजोबा आणि वडिलांनाही कुस्तीची आवड होती, पण आर्थिक अडचणींमुळे ती थांबवावी लागली. वडिलांचे स्वप्न होते की मुलांनी पैलवान व्हावे. त्यांनी आपल्या तिन्ही मुल भैय्या, बादल आणि सनी यांना स्वतः प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पैशांअभावी वडिलांनी झोपडी जवळच्या माळरानावर तात्पुरती मातीची तालीम उभारली आणि मुलांचा सराव सुरू केला. सध्या दहावीत शिकणाऱ्या सनीने महाराष्ट्र चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद आणि राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. आता आशियाई युवा स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेत देशाचा गौरव वाढवला आहे.
शेवटी इच्छा तिथे मार्ग सापडतोच याची प्रचिती ही आली सनीच्या जिद्दीला योग्य मार्गदर्शन मिळाले रायबा तालीमचे वस्ताद पै. सोमनाथ मोझे आणि सदाशिव राखपसरे यांनी त्याला सुरुवातीला मार्गदर्शन केले. पुढे लोणीकंद येथील जाणता राजा तालीममध्ये वस्ताद संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सनी परिपक्व झाला. वस्ताद भोंडवे यांनी सनीला दत्तक घेऊन त्याचा कुस्तीचा सर्व खर्च उचलला मागील आठ वर्षापासुन ते सर्व खर्च करीत आले. एकीकडे दररोजचा सराव सुरू होता. तर दुसर्या बाजूला आई वडिलांचे कष्ट दिसत होते. कुस्ती क्षेत्रामध्ये नाव कमवायचे हाच उद्देश डोळ्यासमोर होता. त्यानुसार दररोज सराव सुरू ठेवला. तर दुसर्या बाजूला शिक्षण देखील सुरू ठेवले. एकामागून एक स्पर्धां जिंकत गेल्यानंतर त्यांची बहरीन येथे होणार्या एशियन युथ गेमसाठी निवड झाली. बहरीन येथे झालेल्या एशियन स्पर्धेत इराक, इरान, जपान, कोरिया आदी देशातील खेळाडू सोबत कुस्ती केली. इराणच्या पैलवानासोबत कुस्ती झाली आणि ती कुस्ती जिंकली आणि सुवर्णपदक जिंकले.

