बीड — बीड जिल्ह्याची अर्थव्यवस्था ऊसतोड कामगारांच्या घामावर अवलंबून आहे. मात्र ती पवन ऊर्जा कंपन्यांच्या जीवावर असल्याचा आभास निर्माण करत कंपन्यांच्या ताटाखालचे मांजर होऊन शेतकऱ्यांना दमदाटी करणे, धमक्या देणे, गुन्हे दाखल करणे एवढेच नाही तर न्याय हक्कासाठी 70 दिवसापासून आंदोलन करत विष पिण्याची वेळ अंबाजोगाई तालुक्यातील जवळगावच्या शेतकऱ्यावर आणली आहे. शेतकऱ्यांपाशी वाघाची भूमिका घेणारे अविनाश पाठक त्याचवेळी पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथील शासकीय साठवण तलावाची जागा बळकावून पवनचक्की कंपनीने पाच कोटी रुपये खर्चून विद्युत उपकेंद्र उभे केले आहे. त्याची चौकशी करताना “शेळ “पटाची भूमिका का घेत आहेत. चौसाळ्याच्या शेतकऱ्याने पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाला आहात का असा प्रश्न उपस्थित केला होता. कमीत कमी हा लागलेला कलंक पुसायचं काम करा. तुमचं द्या हो सोडून किमान जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीची तरी इभ्रत राखा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पा “ठक” साहेब…! जिल्ह्यात तुम्ही अनेक वर्ष सेवा बजावली आहे. राजकारण्यांसह जनमानसाची नाडी एवढ्या वर्षाच्या सेवेच्या कारकिर्दीत समजली आहे. आपल्यातलाच एक माणूस जिल्हाधिकारी पदावर विराजमान झाला याचा आनंद जिल्ह्यातील जनतेला झाला. पण तो तुम्ही क्षणीक ठरवला. पवन ऊर्जा कंपन्यांनी सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचं जीन हराम केलं. कंपन्यांच्या काळ्या गाड्यांच्या दहशतीत वावराव लागतं. कधी कुठून आपल्या शेतावर आक्रमण होईल याची सतत धास्ती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करू, तुरुंगात टाकू, वेळप्रसंगी खंडणी सारखे गुन्हे दाखल करू, कंपन्यांच्या गुंडा मार्फत दमदाटी करणे ,खोटे धनादेश देणे, संपादित जमिनीपेक्षा अधिकच्या जमिनीवर कब्जा करणे यासारख्या एक ना अनेक घटनांनी वर्तमानपत्रांचे रकाने भरू लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय भूमिका घेत शेतकऱ्यांना अश्वस्त करणं हे काम करायचं सोडून शेतकरी कसा अस्वस्थ राहील याकडे तुमचं प्रामाणिक लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पदाची खुर्ची देखील कलंकीत होऊ लागली आहे. यापूर्वी तुमची गाडी माजलगाव न्यायालयाच्या आदेशाने जप्त झाली. ती मावेजा न दिल्यामुळेच झाली होती. एवढंच नाही तर बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तराने शेतकऱ्यांचा मावेजा न्यायालयीन निर्णयानंतर देखील दिला नव्हता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना कैद करा असे आदेश दिले होते. खरे तर त्यावेळीच सगळी इभ्रत गेली होती. कुठेतरी सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. पण जुनी म्हण आहे “नाक कापलं तरी भोक तयार”या म्हणीचीच “रि ” पुन्हा ओढली गेली. हे कमी की काय म्हणून चौसाळ्याच्या शेतकऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या उद्घाटनाला आलेले असताना पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाल का? असा प्रश्नही उपस्थित केला होता. याच्या बातम्या ही माध्यमांनी लावल्या होत्या. पण छेऽऽ! धृतराष्ट्राची एकदा भूमिका घेतल्यावर शेतकऱ्यांचं काहीही होऊ द्या आपण कंपनीशी प्रामाणिक राहायचं याचा एकदा चंग बांधल्यावरच काय करणार?
. अंबाजोगाई तालुक्यातल्या जवळगाव येथील सरकारी जमिनीवर भूमिहीन शेतकरी 1981 पासून उपजीविका करत आहेत. या सरकारी जमिनीवर सोलार प्लांट करण्यात येत आहे. हा प्रकल्प रद्द करून अन्यत्र स्थलांतरित करावा या मागणीसाठी गेल्या 70 दिवसापासून भूमीहीन शेतकरी जवळगाव येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. लोकशाही मार्गाने चाललेल्या या आंदोलन पोलीस बळाचा वापर करत त्यांच्या राहत्या झोपड्यावर जेसीबी चालवून चिरडण्याचा प्रकार आठ एप्रिल रोजी झाला. या घटनेच्या निषेधार्थ चार गायरान धारक शेतकऱ्यांनी उपजीविकेचे साधन जाणार जगून तरी काय करायचं म्हणून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस बळाचा वापर करून वाघाची भूमिका निभावली. पण त्याचवेळी विरोधाभासी भूमिका पाटोदा तालुक्यात घेतली. खेडवळ भाषेत बोलायचं तर शेळपटपणाचा कळस गाठला. धनगर जवळका येथील शासकीय साठवण तलावाच्या जागेवर पवनचक्की कंपनीने अतिक्रमण करून पाच कोटी रुपये खर्च होऊन विद्युत उपकेंद्र तयार केले आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी बीड पोलीस अधीक्षक बीड यांना लेखी तक्रारी केल्या. या शिवाय महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या पुण्यनगरी नावाच्या दैनिकाने आठ भागांची मालिका छापली. पण वातावरणुकूलित केबिन मध्ये बसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना घाम फुटला नाही. त्याची दखल देखील घ्यावी या प्रकरणाची चौकशी करावी. याची हिम्मत झाली नाही. जणूकाही कंपन्यांचे ताटा खालचे मांजर आहोत. एकादा घास आपल्याला मिळेल अशी अपेक्षा ठेवून वाट पाहत बसल्यासारखी स्थिती साहेब तुमची झाली आहे. असा आरोप आता शेतकरी वर्ग करू लागला आहे. पा“ठक” साहेब..! आयुष्यात पैसा मिळेल हो पण तळतळाटाने कमावलेला पैशाची परतफेड वार्धक्य करावी लागते हो ऽऽऽ! किमान याची तरी जाणीव ठेवा असं शेतकरी म्हणू लागला आहे. कमीत कमी जनाची नाही मनाची नाही किमान खुर्चीची तरी इभ्रत राखा होऽऽ! अशी अर्त हाक तळतळलेला शेतकरी मारू लागला आहे याची जाणीव ठेवा. कुठेतरी याला पाय बंद घाला आपलं इमान जनतेशी आहे याची जाणीव होऊ द्या? असं देखील जनतेत बोललं जाऊ लागला आहे.
बुजगावणं उपयोगाच नाही
जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांच्या बाजूने सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. काय चुकलं त्या चौसाळ्याच्या शेतकऱ्याचं ज्याने जिल्हाधिकाऱ्यांना तोंडावर पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाल आहात का? असा प्रश्न विचारला. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून फिरताना गोरगरीब शेतकरी किती बेंबीच्या देठापासून तळतळाट देत आक्रोश करतोय तो आक्रोश आता कानालाही ऐकावा वाटेना. पण आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना याचं काहीच कसं वाटेना याचा विचार करतोय. तळतात फेडावा लागतो म्हणतात. ते भेडतील ही पण गोरगरीब शेतकरी आज भरडला जातोय त्याचं काय? पवनचक्की सौर ऊर्जा कंपनी यांनी हे पाठक नावाचं बुजगावणं उभा करून पोटाच्या मागे लागलेल्या जनतेला भेडवायचं काम सुरू केलेला आहे. लक्षवेधी आंदोलन करून देखील त्याचा फायदा झाला नाही. जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे त्या खुर्चीची “पत” ढासळली असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या काळात ताटा खालचं मांजर असल्यासारखी भूमिका एका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नव्हती. ती आता घेतली जात आहे. पालकमंत्री अजित दादा पवार यांनी असल्या माणसा विरोधात कारवाई करून हकालपट्टी करावी.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर