बीड — नेकनूर बाजारातून गहाळ अथवा चोरी झालेले मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. एक लाख 92 हजार रुपये किमतीचे दहा तक्रारदारांचे मोबाईल पोलिसांनी मिळवून दिल्यामुळे तक्रारदारातून समाधान व्यक्त केले जात आहे.
नेकनूर शहरात जनावरांचा बाजार भरत असल्यामुळे बाजारामध्ये येणारांची संख्या मोठी आहे. प्रचंड गर्दीचे ठिकाण असल्यामुळे चोरीच्या घटना घडत राहतात. दरम्यान खिसे कापू, मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. या बाजारातून अनेक मोबाईल चोरी होतात काही गहाळ होतात. अशा अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याची दखल घेत सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी पोलीस स्टेशन नेकनूर येथे असलेले सायबर डेक्सचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे व अमलदार दादासाहेब उबाळे, विशाल क्षिरसागर याना या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिले. या तक्रारींच्या अधारे तांत्रिक तपास करुन एकूण १० मोबाईल किंमत १ लाख ९२ हजार हस्तगत केले. हे मोबाईल तक्रारदार ऋषीकांत तांदळे रा. अंबीलवडगाव, बळीराम बाबुराव कदम रा. मांडवखेल, संजय लोखंडे रा. नेकनूर, अशोक रामदास काळे रा. घारगाव, संदिप अंगदराव शिंदे रा. नेकनूर, सुरेश साहेबराव निर्मळ रा. लिंबागणेश, विजयकुमार सदाशिव सोळंखे रा. खरमाटा, श्रेयश लक्ष्मण ढास रा. खडकीघाट, सुधाकर पवार रा. सफेपुर, कैलास ज्ञानोबा खाकरे रा. बीड यांना परत केले. गेलेले मोबाईल परत मिळाल्याने या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मिना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेकनूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, पोउपनि आप्पासाहेब रोकडे, विशाल क्षीरसागर, दादासाहेब उबाळे तसेच टेक्निकल एनालिसेस सेल बीड येथील पोलीस अमलदार विक्की सुरवसे यांनी केली आहे.

