बीड — फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.या भगिनीस न्याय मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरु राहील अशी ग्वाही या कुटुंबियांना दिली.तसेच निवृत्त न्यायमूर्तींकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशा संवेदनशील प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी अतिशय जपून विधाने करणे आवश्यक असते. परंतु सत्ताधाऱ्यांकडून होणारी विधाने असंवेदशील, दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी आहेत.
डॉ संपदा यांच्या मोबाईलचा सीडीआर लीक कसा झाला हा प्रश्न आहे. त्यांचे आत्महत्या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे का अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी एसआयटीची स्थापना व्हावी अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या लेकीला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वशक्तीनिशी मुंडे कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहोत. महाराष्ट्राच्या लेकीवर अन्याय करणाऱ्याला जर कुणी वाचविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आम्ही माफ करणार नाही अशी ग्वाही याप्रसंगी दिली.
यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे,आमदार संदिप क्षीरसागर, पृथ्वीराज साठे, रोहिणीताई खडसे, महेबूब शेख, डॉ नरेंद्र काळे, ॲड हेमा पिंपळे, मनाली भिलारे, अमृता काळदाते, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.

