बीड — “सकाळून चौसाळा दुपारून बावचळला” ही म्हण प्रचलित आहे. त्याला कारणही तसंच आहे. हातभट्टीसह देशी दारूचा झटका शहराच्या वातावरणात नवा तडका लावण्याच काम करतय तर शहराची अर्थव्यवस्थाच मटक्यावर तरली आहे. हे कमी की काय म्हणून वेश्याव्यवसाय देखील फुलू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यात गरिबांचे संसार मात्र उध्वस्त होऊ लागले आहेत.
चौसाळा जि प शाळेच्या प्रांगणातच जुगाऱ्यांचे अड्डे निर्माण झाले आहेत. झाडांच्या सावलीला बसून राजरोस मटका नावाचा जुगार घेत स्वतःचं बुकी वाले कल्याण करून घेण्यात दंग आहेत. या ठिकाणी ज्ञानार्जनाचं काम चालतं याचा विसर देखील पडला आहे. मटक्यातल्या प्रोफेसरांची वाढती वर्दळ विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढवू लागले आहेत. नुसतं मटक्यावरच काम भागत नाही तर त्याला जोड हातभट्टी, देशी दारूची ही लागत आहे. राजरोसपणाने विक्री होणाऱ्या दारूला अवैध तरी कसं म्हणायचं? त्याला नेकनूर ठाणे प्रमुखाची मूकसंमती आहे. झिंगाटलेले बेवडे रस्त्यावर सुखाची लोळण घेत रहदारीला अडथळा निर्माण करत आहेत. स्वर्ग सुख मदिराधीन झालेल्यांना मिळत असलं तरी बस स्थानकासमोरील त्यांचं भजनासह सुरू असलेलं कथ्थक महिला प्रवाशांना डोकेदुखीच बनलं आहे. अहो स्वर्ग सुख काय असतं हे पाहायचं असेल जीवाची मुंबई करायची असेल तर रंभा अप्सरा उर्वशी मेनका देवाची नाव वापरत असलेल्या हॉटेल मधून आंबट शौकिनांना उपलब्ध आहेत. मग सकाळून चौसाळा दुपारून बावचळला ही म्हण का प्रचलित होऊ लागली आहे याची अनुभूती शहरात प्रवेश केल्यावर आल्याशिवाय राहत नाही. गोरगरिबांचे संसार उघड्यावर पडत अंगाला राख फासून ” संन्यासी “बनण्याची वेळ अनेकांवर येऊन ठेपली आहे.
कायदा सुव्यवस्था याच्याशी देणं घेणं नाही. पोलीस अधीक्षक नवनीत कावत किती जरी अवैध धंद्यावर लगाम लावण्याचे काम करत असले तरी त्यांच्या प्रामाणिकतेला सुरुंग लावण्याचे काम केलं जात आहे. वरिष्ठांचं ऐकायचं नाही याचा विडा उचललाय की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे.यावर आळा घालण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.

