उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन दिले निवेदन
मुंबई — बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कन्या डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बीड जिल्ह्यातील मौजे कोठरबन येथील रहिवासी असलेल्या व फलटण येथे कार्यरत असणाऱ्या डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली आहे.
आ.संदीप क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, शिव-फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रगतशील महाराष्ट्र राज्यामध्ये एक महिला डॉक्टर आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलते या सारखे दुर्दैव नाही.फलटण येथील पोलिस प्रशासन व आरोग्य प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून स्व.डॉ.संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. यामुळे बीड जिल्ह्यात गंभीर पडसाद उमटले आहेत.
ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. डॉ.संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करून मुंडे कुटुंबाला न्याय देण्याची मागणी बीड विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवारांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

