Saturday, December 13, 2025

डॉ. योगेश क्षीरसागर भाजपात, बीडच्या न.प‌.निवडणुकीला कलाटणी

बीड —  नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर व डॉ.सारिका क्षीरसागर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भाजपात रविवारी (दि.१६) प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तसेच राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. क्षीरसागर दाम्पत्याने घेतलेला निर्णय ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बीड नगरपालिकेच्या राजकारणाला डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे कलाटणी मिळाली आहे. न प निवडणुकीत बीडमध्ये व्हेंटिलेटर वर असलेली भाजपा पक्षप्रवेशामुळे प्रबळ बनली आहे. याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपला याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे.डाॉ. क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशावेळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण व पशुसंवर्धन पंकजाताई मुंडे यांनी क्षीरसागर दाम्पत्याचे भाजपात स्वागत केले. कार्यक्रमाला भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, नगरसेवक शुभम धूत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. भाजपमध्ये प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, “पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजाताई मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू होती. आता आम्ही भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहोत. बीड नगरपरिषदेसाठी जागा महिलांसाठी राखीव आहे, त्यानुसार आम्ही निवडणूक लढवू. भाजप आणि आमचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतील.” राष्ट्रवादी सोडण्यामागे काही कारणे होती, आता मोकळा श्वास घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, “बाहेरचे लोक बीडमध्ये येऊन वेगवेगळ्या निवडणुकीत प्रयोग करत आले, परंतु बीडकरांनी ते सातत्याने हाणून पाडले. हा प्रयोगही बीडकर हाणून पाडतील आणि स्वाभिमान जपतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीसाठी भाजप संपूर्ण ताकद देणार

डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे ह्या संपूर्ण ताकद देणार असून खंबीरपणे पाठीशी उभा राहणार असल्याचा शब्द देखील त्यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles