बीड — न.प निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख दोन दिवसांवर आलेली असतानाच अजित पवारांची राष्ट्रवादी बंडाळीच्या फेऱ्यात अडकली आहे. स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याच्या कारणावरून डॉ. योगेश क्षीरसागर यांनी बीड विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात बंडाळीचे ग्रहण लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची 17 नोव्हेंबर शेवटची तारीख असली तरी बहुतांश राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले नाहीत.त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र अमरसिंह पंडितांच्या शिवछत्र मधून हलवली जात आहेत. त्यातूनच क्षीरसागर मुक्त नगरपालिका असा नारा ही समाज माध्यमातून दिला जात आहे. अशावेळी डॉ. योगेश क्षीरसागर यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून देखील वगळण्यात आले.
डॉ. योगेश क्षीरसागर यांना साईडलाईन करत न.प. निवडणुकीची रणनीती आणि उमेदवार निश्चिती पंडितांच्या शिवछत्र च्या मार्गदर्शनाखाली सुरु केली आहे. या सर्व अन्यायाची माहिती डॉ .योगेश क्षीरसागर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वारंवार सांगितली. मात्र तरीदेखील यामध्ये कुठलाच बदल झाला नाही. परिणामी फेसबुक वर “विकास हाच धर्म, विकास हीच जात” असा नारा देत कव्हर फोटो बदलला आहे. यामध्ये दिवंगत केशरबाई क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर व चुलते जयदत्त क्षीरसागर यांचे फोटो ठेवले आहेत.
एवढ्यावरच ते डॉ. योगेश क्षीरसागर थांबले नाहीत तर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून डावलल्याची खंत व्यक्त करत बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे दिला आहे. दरम्यान बीड नगरपालिकेवर क्षीरसागर घराण्याचं आज पर्यंत वर्चस्व राहिलेलं आहे.डाॅ. भारत भूषण क्षीरसागर व नगराध्यक्षपद इतकं समीकरण जुळलं होतं की त्यांचं नावच जनतेने अध्यक्ष साहेब असच ठेवलं होतं. डॉ. योगेश क्षीरसागर बीड नगरपालिकेत “एकला चलो “ची भूमिका घेतात की भाजपची वाट पकडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

