मंत्री मकरंद जाधव यांनी दिले बैठकीचे आश्वासन
गेवराई — गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात गेवराई विधानसभा मतदार संघातील गोदावरी काठच्या ३२ पूरग्रस्त गावांचे पुर्नवसन करण्याची मागणी लक्षवेधीद्वारे मांडली. लक्षवेधीला उत्तर देताना मदत व पुर्नवसन मंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी अधिवेशन संपल्यानंतर या बाबत मुंबईमध्ये बैठक घेऊन पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीकाठावरील ३२ पुरग्रस्त गावांच्या पुर्नवसनाचा प्रश्न लक्षवेधीद्वारे मांडला. यावेळी बोलताना आ. पंडित म्हणाले की, नाशिक तसेच जायकवाडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडावा लागत असून यामुळे गेवराई विधानसभा मतदार संघातील पाथरवाला, गुंतेगाव, सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभूवन (शनिचे), गुळज यांच्यासह एकूण ३२ गावांना दरवर्षी पुराचा गंभीर धोका निर्माण होतो. सन २००६ मध्ये जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीस महापूर आला आणि गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या ३२ गावांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होवून घरांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. अनेक नागरीकांना स्थलांतर करावे लागले. त्या अनुषंगाने तत्कालीन सरकारने सदर ३२ गावांचा पुर्नवसन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आज १९ वर्षे उलटूनही पुर्नवसनाचा प्रश्न कायम प्रलंबित आहे. यावर्षी २०२५ मध्येही जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाल्याने संबंधित गावांत पुन्हा एकदा पुर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले होते. अशावेळी आम्ही त्यांना धिर दिला, अशा या गंभीर परिस्थितीत प्रशासनाकडून वेळेवर सक्षम उपाययोजना करणे आवश्यक असून त्याअनुषंगाने जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी गेवराई तालुक्यातील ३२ गावांचे पुर्नवसन करण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी केली.
आ. विजयसिंह पंडित यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले की, हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुंबई येथे या बाबत सविस्तर बैठक घेण्यात येईल. बैठकीला आ. विजयसिंह पंडित यांच्यासह मराठवाड्यातील आमदारांना निमंत्रित करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. गेवराई विधानसभा मतदार संघातील गोदाकाठच्या पुरग्रस्त ३२ गावांच्या पुर्नवसनाचा प्रश्न आ. विजयसिंह पंडित यांनी हिवाळी अधिवेशनात मांडल्यामुळे गोदाकाठावरील गावातील शेतकरी आणि नागरीकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

