बीड — किरकोळ कारणावरून शहरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका तरुणाचा खून झाला. दुचाकीची किल्ली काढून घेतल्याने ती परत दे असे सांगूनही तो देत नसल्याने मित्राने रागाच्या भरात वार करुन हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयित अभिषेक राम गायकवाड यास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरातील आशा टॉकीज परिसरातील तुळजाई चौकात ही घटना घडली. चाकूने वार करुन हल्लेखोर पसार झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजय सुनील काळे वय 25 वर्ष यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विजय काळेचा मृत्यू झाला. शिवाजीनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लगेचच चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीतून संशयित कळल्यावर त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी व मृत हे एकमेकांचे मित्र होते. दारूच्या नशेत हे कृत्य घडल्याचेही सांगितले जात आहे. शिवाजीनगर पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान मित्राच्या छातीत चाकू खुपसून पसार झालेल्या संशयित अभिषेक राम गायकवाड याच्या अटकेसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याची चार पथके स्थापन केली होती. त्यातील दोन पथकांनी रात्रभर शोध घेऊन पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील डोंगरपट्ट्यात दबा धरून बसलेल्या गायकवाडला पोलिसांनी सापळा रचून पकडले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किशोर पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवाजी बंटेवाड, सहाय्यक निरीक्षक विलास मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

