बीड — एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. एका सात महिन्यांच्या मुलीच्या घशात चॉकलेट अडकल्यानं तिचा हृदयद्रावक अंत झाला आहे. या चिमुरडीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी बीडच जिल्हा रुग्णालय गाठलं.
बीड तालुक्यातील काटवटवाडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोही आनंद खोड असं मृत मुलीचं नाव असून ती अवघ्या सात महिन्यांची होती. घरातच खेळत असताना खाली पडलेलं चॉकलेट तिने तोंडात टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चॉकलेट तिच्या घशात अडकलं आणि तिचा यात दुर्दैवी अंत झाला. आपली सात महिन्यांनी लेक गेल्यानं आई-वडिलांसह कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. तसेच या घटनेनं परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.
बेपत्ता 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
बीड शहरालगत असलेल्या इमामपूर परिसरात मागच्या दोन दिवसांपासून एका पाठोपाठ एक अशा हादरवणाऱ्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. आता वडिलांसोबत दोन दिवसांपूर्वी घरातून निघालेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीचा गळाफास घेतलेल्या अवस्थेतीत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्या चिमुरडीच्या पित्याचाही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. आता या चिमुकल्या मुलीचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बीड जवळील इमामपूर रोड परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीचा गळफास दिलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वी याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
या परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणांना एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला

