केज — कळंब आगाराची बस केजहून कळंब कडे जाताना तिने अचानक पेट घेतला चालक व वाहकाच्या प्रसंगावधानाने 22 प्रवाशांचा जीव वाचला. या दुर्घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास घडली.
कळंब बस आगाराची बस एम एच 11/ बी एल 9374 केज येथून दुपारी 3:20 वाजण्याच्या दरम्यान २२ प्रवाशांना घेऊन कळंबकडे निघाली. केज साळेगाव दरम्यान बोबडेवाडी शिवारातील शेख फरीद बाबा दर्ग्याजवळ बस आली असता बसच्या बोनटने अचानक पेट घेतला.ही बाब चालक बारकुल यांच्या निदर्शनास येताच प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवत प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. यावेळी बस मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या गर्दीने तीन वृद्ध महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.
केज व कळंब येथील अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. काहीवेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. बस चालक बारकुल व वाहक भांगे यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. यात 22 प्रवाशांचा जीव वाचला आहे. दरम्यान याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

