केज — तालुक्यातील एका माजी सरपंचासह एका कृषी पंप व्यापाऱ्याने तामिळनाडू राज्यात बनावट नोटा चालवण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला. तामिळनाडू पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून साडेआठ लाख रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवाकुडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.या प्रकरणाचा तपास तामिळनाडूच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे.
केज येथील माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे आणि मूळचा राजस्थानचा असलेला व्यापारी नारायण राम पटेल हे दोघे त्यांच्या खाजगी कार क्र.एम.एच 44 झेड 2383 ने तामिळनाडूत फिरायला गेले होते. बुधवारी इंधन भरताना त्यांनी एका पेट्रोल पंपावर 200 रुपयांच्या काही नोटा दिल्या. तेथून ते निघूनही गेले मात्र कर्मचाऱ्याला नोटांचा स्पर्श आणि कागदावरून संशय आला. त्याने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी मंजाथिदल चेक पोस्टवर सापळा रचून ही कार अडवली. कार अडवल्यानंतर
पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये 200 रुपयांच्या बनावट नोटांचे तब्बल 41 बंडल दडवून ठेवलेले आढळले. कारवाईत सापडलेल्या 8 लाख 37 हजार 800 रुपयांच्या नोटा या बनावट असल्याचे समोर आले. तपासादरम्यान या दोघांनी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर भागात यापूर्वीच अनेक नोटा चलनात आणल्याची कबुली दिली आहे.
या बनावट नोटा त्यांना कोणी पुरवल्या? या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत? आणि तामिळनाडूमध्ये त्यांना कोणी आश्रय दिला होता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता गुप्त वार्ता विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभाग सक्रिय झाला आहे. या घटनेमुळे केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.




