केज — जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेची लक्तर रोज वेशीवर टांगली जाऊ लागली आहेत. पोलीस अधीक्षक मात्र अशा घटनांकडे दुर्लक्ष करून महिमा मंडन करण्यात मश्गुल आहेत.परिणामी खाकीचा धाक राहिलेला नसल्याने गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच केज मधील हनुमंत पिंपरी शिवारात 25 वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली.
पोलीस अधीक्षकांची माध्यमांकडे पाहण्याची धृतराष्ट्रासारखी भूमिका, पोलीस अधिकाऱ्यांना दिलं जाणार पाठबळ यामुळे अवैध धंद्यांसोबतच गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. खाकीचा धाक उरला नाही त्यामुळे राजरोसपणे मुडदे पाडले जात आहेत. पोलीस यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाला आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात असताना सर्वसामान्यांच जीवन मात्र अवघड होऊन बसला आहे. त्यातच हनुमंत पिंपरी मध्ये 25 वर्षाच्या तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली.विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव असं मृत तरुणाचं नाव आहे. केवड आणि हनुमंत पिंपरीच्या शिवारात विक्कीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. अज्ञात हल्लेखोराने विक्कीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. जखम खोल असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी 10 च्या सुमारास ही घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.घटनेची माहिती मिळताच केज पोलीस दलासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटेश देशपांडे, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, इनामदार आणि अशोक सोनवणे यांनी घटना स्थळाचा पंचनामा करून तपास वेगाने सुरू केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत महेश चंदनशिव नावाच्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. हा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.




