मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, आपत्ती विभाग मंत्र्यांना दिले पत्र
बीड — मागील काही काळात सततच्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे कपिलधारवाडी येथे भूस्खलन झाले आहे. यामुळे गावकऱ्यांचा जीव धोक्यात असून त्यांचे तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
मौजे पाली ग्रामपंचायत अंतर्गत कपिलधारवाडी छोटेसे ९० कुटुंबाचे गाव वास्तव्यास आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे वातीवृष्टीमुळे सदरील गाव अतिशय गंभीर संकटात सापडले आहे. या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावांमध्ये भूस्खलन सुरू झाले असून जमिनीत, डोंगराच्या कडेला, रस्त्यावर, शाळा खोली, घरे, मंदिरे, संरक्षण भिंत व इतर ठिकाणी मोठ्या भेगा व तडे गेले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. ग्रामस्थांना घरी जाणे धोकादायक झाल्याने ग्रामस्थांना, आबालवृद्धांना,महिला भगिनींना, शाळकरी विद्यार्थ्यांना, दिवस व रात्र आजच्या घडीला श्री. मन्मथ स्वामी देवस्थान, कपिलधार या ठिकाणी वास्तव्य करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना कायमस्वरूपी दिलासा देणे व तातडीने पुनर्वसन होणे आवश्यक आहे. यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जसे की, १) कपिलधारवाडी गाव तातडीने धोकाग्रस्त क्षेत्र घोषित करावे २) प्रभावित सर्व कुटुंबाचे तातडीने स्थलांतर व पुनर्वसन व्यवस्था करावी ३) कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी नवीन जागा व निवासी योजना जाहीर करून तात्काळ अंमलबजावणी व्हावी ४) शाळा व सार्वजनिक इमारतीची सुरक्षा तपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था करावी ५) या सर्व कामांसाठी आपत्ती निवारण निधी नरेगा व पुनर्वसन विभागाचा निधी तथा इतर योजनेमधून निधी मंजूर करून ग्रामस्थांना यथोचित सहकार्य व्हावे अशा विविध मागण्यांचे पत्र आ. संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मा.ना.मकरंद जाधव पाटील, आपत्ती विभाग मंत्री मा.ना.गिरीश महाजन यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर, जिल्हाधिकारी, बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा आपत्ती व व्यवस्थापन, बीड, उपविभागीय अधिकारी बीड, तहसीलदार बीड, गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड यांना पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.

