कपिलधारवाडी प्रश्न मा.अजित पवार यांची डॉ. ज्योती मेटे यांनी घेतली
गावात आणि परिसरात अनेक ठिकाणी रातोरात पडल्या भेगा
बीड — तालुक्यातील कपिलधार वाडी हे गाव डोंगराच्या कुशीत बसलेले आहे. या गावात आणि परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचे पहावयास मिळत आहे. मागील काळात झालेला मुसळधार पाऊस आणि येणाऱ्या काळात परतीचा पाऊस पडल्यास या ठिकाणी माळीण सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांचे रात्रीतून स्थलांतर करण्यात आले असून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना गरजेची आहे. यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांची शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी भेट घेतली.

परतीच्या पावसाने मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून गेला आहे. रस्ते पूल वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी देखील वाहून गेले आहेत. यातच बीड तालुक्यातील कपिलधार वाडी या गावाला भूस्खलनासारख्या संकटाला समोर जाण्याची वेळ आली आहे. या गावांमध्ये अनेक ठिकाणी जमिनींना भेगा पडल्या आहेत प्रशासनाने याची दखल घेत गावकऱ्यांना या ठिकाणाहून कपिलधार येतील मन्मथ स्वामी मंदिर येथे स्थलांतरित केले आहे. परंतु या गावकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासादायक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांच्याशी संवाद साधून व्यथा मांडल्यानंतर लागलीच डॉक्टर ज्योती मेटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे तज्ञांमार्फत या गावाचे परिसराची पाहणी करण्यात येऊन यथोचित कार्यवाहीस्तव कृपया जिल्हाधिकारी यांस सुचित करावे तसेच गावकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरविण्यात यावी आणि अतिवृष्टीमुळे ज्या गावातील रस्ते, पूल वाहून गेले आहेत त्या रस्ते व पुलांचे काम तत्काळ हाती घेण्यात यावे असे निवेदन सादर केले.

