जोपर्यंत कार्यकर्त्यांच्या निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही बैठकीत आ.संदीप क्षीरसागरांची ग्वाही
बीड आणि शिरूर (का) तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
बीड — जोपर्यंत कार्यकर्त्याच्या निवडणूका होत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही आणि अडचणीच्या काळात सोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांना आयुष्यभर विसरणार नसल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी बैठकीतून सांगितले.
बीड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.२४ (शुक्रवार) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद चंद्र पवार गट) च्या वतीने आ. संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड आणि शिरूर कासार तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आ. संदीप क्षीरसागर यांनी बोलावलेल्या या बैठकीला पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
याबैठकीला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी उपस्थितांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी संदर्भातील संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार आराखडा आणि पक्ष बळकटीकरण यावर मार्गदर्शन केले.
यावेळी आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, माझ्या आमदारकीच्या निवडणुकीत अडचणीच्या काळात सोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांना आयुष्यभर विसरणार नाही. विधानसभेच्या वेळी कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्यासाठी काम करणार आहे.
जोपर्यंत कार्यकर्त्यांच्या निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत मी आराम करणार नाही. आताच्या घडीला तरी आपल्या समोर कोणीच दिसत नाही. कारण आपण रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत.त्यामुळे जनतेचा आपल्याला पाठिंबा आणि आशीर्वाद मिळतोय. आपल्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट आणि ठोस आहे. जवळची माणसं सोबत असल्याने ठोस आणि ठामपणे भूमिका घेतो. येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ओबीसी मराठा वाद डोक्यातून काढला पाहिजे. सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करा. राज्य सरकारच्या पॅकेज ने शेतकरी बांधव संतुष्ट नाही. सरकारला देखील ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पराभव दिसत असल्याने नगरपालिकेची निवडणूक ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या अगोदर घेत आहेत. कार्यकर्त्यांना आवाहन करताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, कार्यकर्त्यांनो गुत्तेदारीसाठी निवडणुका लढू नका. अगोदरच स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये प्रशासक असल्याने नागरिकांचे कामे रखडली आहेत. लोकांच्या कामासाठी रस्त्यावर उतरून प्रश्न मार्गी लावा. ही जनता काम करणाऱ्याच्या कायम पाठीशी उभी राहते. येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझ्या अडचणीच्या काळात सोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय खेचून आणायचा आणण्यासाठी चेन पद्धतीने चालायाचे आहे. चेन पद्धतीने आपण मोठ्या फरकाने विजय मिळवू असा विश्वास देखील दिला. कार्यकर्त्यांनी देखील आ.संदीप भैय्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून जिल्हा परिषद व पंचायत समिती ताब्यात आणण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी माजी आ.सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राज्याचे प्रवक्ते शिवराज बांगर, वैजनाथ तांदळे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाहेरच्या लोकांनी बीड मध्ये जातीवाद करून अस्थिरता निर्माण करू नये – आ.संदीप क्षीरसागर
राज्यात किंवा बीड जिल्ह्यात एखादी वाईट घटना घडली की बीड पासून मोर्चे आंदोलने काढली जातात. हे मोर्चे आंदोलने काढणारे मुळात बीडचे नसतात. हे सर्व जातीवादी लोक बाहेरच्या जिल्ह्यातील असतात. त्यांच्याकडून बीडचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम, ओबीसी मराठा वाद निर्माण करायचा. यातून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असते. या बीडमध्ये आम्ही सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतो. त्यामुळे परळी सारखा पॅटर्न बीडमध्ये घडत नाही. बाहेरील जिल्ह्यातील लोकांकडून बीडचे वातावरण अस्थिर केले जात आहे. त्यांच्या भूलथापांना बळी न पडता सर्व समाजाने आंदनात राहून एकत्र असल्याचे दाखवून द्या असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

