बीड — लोकशाही संपून रजाकारी राजवट सुरू झालेली आहे. लोकशाहीत शेतकरी वर्ग माजला होता.पवन ऊर्जा कंपन्यांच्या लोकांना पिकातून गाड्या नेऊ न देणे, अतिक्रमण करताना अडथळा आणणे, मावेजा मागणे यासारख्या गोष्टी करून शेतकरी न्याय अधिकाराच्या गप्पा मारून आडवे येत आहेत. जिल्ह्यातील चोर, दरोडेखोर माफिया, गुंड माजले तरी चालतील पण एस पी साहेब एकदा या शेतकऱ्यांना कायमचा धडा शिकवा. कंपन्यांच्या मिठाला जागणं काय असतं हे एकदा आपल्या कर्तव्यातून दाखवून द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.

एस पी साहेब… मोगली राजवट शेकडो वर्ष गोरगरीब जनतेने सहन केली.त्यानंतर इंग्रज राजवटीत ही घराची होणारी धूळधाण गोरगरीब जनतेने अनूभवली एव्हाना गुलामगीरी अनेकांच्या रक्तात मूरली जायला पाहिजे होती.असं असताना अन्याय अत्याचार पिढ्यान् पिढ्या सहन करायची सवय रक्त सांडून घरावर तुळशीपत्र ठेवून मिळवलेल्या लोकशाहीत मोडली गेली शिक्षणामूळे न्याय अधिकार जनतेला कळू लागला. इथच सगळं अवघड झालं.

सध्या अघोषित मोगली राजवट सुरू आहे. कंपन्यांची गुलामगिरी ज्यांच्या रक्तात मुरली आहे ते पुन्हा कंपन्यांचे दलाल म्हणून काम करू लागले आहेत. मग हे करताना थोडाफार शेतकऱ्यांनी अन्याय अत्याचार सहन केला तर त्यांच्या बापाचं काय जातंय? उगाच अधिकार न्यायाच्या गप्पा मारून कंपन्यांच्या कामात अडथळा आणू लागले आहेत.

झाली एखाद्या शेतकऱ्याच्या घराची धूळधाण, पवन ऊर्जा कंपन्यांनी केल अतिक्रमण, उभ्या पिकातून कंपन्यांनी गाड्या घातल्या तर यांचा बिघडतं कुठं? काय फरक पडणार आहे यांची लेकरं बाळ उपाशी मेली नाही शिकली तर.. हा विचार का केला जात नाही शेवटी शेतकऱ्यांनी गुलामगिरी नाही करायची तर कोणी करायची अपयशी ठरली म्हणून काही शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या तर थोडाच फरक पडणार आहे. कंपन्यांना मावेजासाठी काम न करू देणे कुठल्या कायद्यात बसते हे तुम्ही सांगा. फरक फक्त वतनदार (नोकरदार), मनसबदार(लोकप्रतिनिधी) यांच्या लेकरा बाळांसाठी विनाकारण अन्न पिकवण्याचे काम हे करत आहेत. नाहीतरी दुसरं ते काय करणार? चौकीदारीचे काम करताना थोड्याफार चोरी, दरोडे, गुंडगिरी, माफियागिरी, महिलावर अत्याचार, झाले तरी त्यांच्यावर कधीही कारवाई करता येऊ शकते. कृष्णा आंधळे सारखे सतीश भोसले उर्फ खोक्यासारखी माणसं फरार झाली तरी ते कधीही पकडता येतील हो!
मात्र शेतकऱ्यांनी न्याय हक्काची मागणी करून माज दाखवला नाही पाहिजे हे महत्त्वाचं आहे. “जय जवान जय किसान”हा नारा लोकशाहीत दिला गेला. कुठेतरी भलं होईल अशी अपेक्षा त्यावेळी व्यक्त केली गेली. मात्र सध्याच्या रजाकारी जमान्यात असे नारे मातीमोल करण कर्तव्य नाही काय? कंपन्यांचा मीठ खाल्ल्यावर त्यांची रखवाली करायची नाही तर उपटसुंभ्यांची का करायची? हा मोठा प्रश्न आहे.

साहेब आता हेच बघा ना गेवराई तालुक्यातील महादेव तांड्यावरिल शेतकऱ्यांनी सेल रिपावर प्रायव्हेट लिमिटेड विरोधात उपोषण केलं. का तर म्हणे भाडे पत्र करून घेतलं पण भाडं देण्यास कंपनीने नकार दिला. अहो दिला नकार तर बिघडलं कुठं त्यांना धमकावलं तरी मुकाट गप्प बसायला हवं होतं. हो..! ना ..! एवढं सुद्धा शेतकऱ्यांना तसदी घ्यावी वाटत नाही हे व्यवस्थेच दुर्दैव नाही काय? रिन्यू कंपनी मुळूकवाडी शिवारात पवन चक्की उभारण्याचं काम करत आहे. रोहित ढास या शेतकऱ्याची गट नंबर 657 मध्ये जमीन आहे. या जमिनीतील उभ्या पिकातून कंपनीच्या लोकांनी गाड्या नेल्या. पीक उध्वस्त केलं. मला सांगा साहेब कंपनीच्या लोकांचं काय चुकलं? तरी तो शेतकरी माझं नुकसान झालं माझं नुकसान झालं म्हणून निवेदन देऊन हाकाटी मारीत बसला असं कुठे असतं का?
चौसाळ्याजवळील सुलतानपूर येथील शेतकऱ्यांने ओटू कंपनीने पोलीस संरक्षणात तारा ओढण्याचं काम सुरू केलं. यावेळी देखील शेतकऱ्यांनी असाच माज दाखवला. कंपनीने पोलिसांसोबत भाडोत्री गुंड देखील सोबत आणले होते. त्यांना न जुमानता पीक निघाल्यानंतर काम करा. मावेजा द्या असं म्हणून पंजाब अनुरथ नाईकवाडे या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी मात्र त्याला चांगलाच धडा शिकवला. पंजाब नाईकवाडे व त्यांचे वडील अनुरथ नाईकवाडे या दोघांनाही चौसाळ्याच्या चौकीत नेऊन गुन्हा दाखल करण्याचा धाकधपशा दाखवला. अहो तो दाखवण गरजेचंच आहे. मावेजा दिला नाही म्हणून कुणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतो का? धनगर जवळका येथे पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीवर रेण्यू पावर कंपनीने 220 केव्हीचे उपकेंद्र बांधले. ते बांधलं म्हणून शेतकऱ्यांना संतापन्याची गरज काय होती. पण नाही यांना शेतीला पाणी पाहिजे म्हणे? अहो शेतीला पाणी मिळालं शेतकऱ्यांना समृद्धी आली. तर आत्महत्या करून मरणार कसे? लोकसंख्या कमी होणार कशी? शेवटी कुठेतरी याचा विचार करावाच लागेल ना? पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथील शेतकरी बापू बंकट आर्सूळ तसेच मयूर भाऊसाहेब झोडगे या दोन शेतकऱ्यांनी देखील मावेजा मिळाल्यानंतर शेतातून काम करा असं सांगितल्यानंतर पाटोदा पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधून रात्रभर डांबून ठेवले. याच ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी मुस्तफा पठाण नावाचा पत्रकार गेला. काय गरज होती त्याला असले कुटाणे करण्याची शेतकऱ्यांची बाजू मांडल्याने कुठे पोट भरत असत का? एवढं सुद्धा त्याला कळालं नाही. ज्ञानी विद्वान समजले जाणारे अधिकारी कर्मचारी कंपन्यांपुढे लाळघोटेपणा करतात एवढं सुद्धा त्याला माहीत नसावं हे किती दुर्दैव म्हणावे लागेल या रजाकरी जमान्याचं हो ना? अहो अशाच देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांची मुलं येणाऱ्या काळात गुंड म्हणून कंपन्यांना वापरायला मिळणार नाहीत काय? त्यातून अर्थचक्र फिरणार नाही काय? हे का कळत नसावं या शेतकऱ्यांना?
त्यातच पुन्हा डॉक्टर असलेले गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ता म्हणून एकटेच लढत आहेत काय गरज आहे हो त्यांना असल्या गोष्टी करण्याची? थोडं आपल्याही व्यवसायाकडे लक्ष द्यावं हे त्यांना का कळत नसेल? शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे म्हणे त्यांना? त्यासाठी कागदाची चिठोरी एस पी साहेब तुम्हाला पाठवली पण बरं झालं तुम्ही त्याला केराची टोपली दाखवली. नाहीतर काय? कंपन्यांच संरक्षण महत्त्वाचं की असल्या फुटकळ गोष्टीकडे लक्ष देत वेळ घालवायचा? हे का कळालं नसेल? डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकरांना? अहो शेवटी कंपन्या अर्थचक्राला गती देतात म्हणूनच तर सर्व कर्मचाऱ्यांना पोटभर खायला मिळते. ही बाब ते का विसरतात हे त्यांनाच ठाऊक? शेवटी शेतकऱ्यांच योगदानच काय? एस पी साहेब…! तुम्ही कंपन्यांच संरक्षण करण्याचं फर्मान काढलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाग आली. तुमच्याच फर्मानाची रि ओढत त्यांनी देखील नव फरमान काढलं. शेवटी असं शेतकऱ्यांना कोंडीत पकडायची रणनीती आखायला बुद्धिवंत, कर्तव्यदक्षच चौकीदार असावा लागतो. याची प्रचिती येऊन देखील शेतकरी अधिकाराची न्यायाची भाषा करून कंपन्यांना वेठीस धरण्याचं काम करताहेत हे सशक्त रजाकारी जमान्याला अशोभनीय नाही काय? जिथे जिथे कंपन्यांचं काम आहे त्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर एकदाचा “वामना’ सारखा पाय द्या? बळीराजा पाताळात गेला हे पुरानातच नव्हतं तर सध्याही हेच सुरू आहे हे दाखवून द्या? तुमच्या कर्तव्यदक्षतेची चांगलीच दहशत या मुजोर शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे एवढंच…..!

