एस पी साहेब…! न्यायाचं तराजूच झुकलेलं; तिथे दराडेंचं वर्तन चुकलेलंच

बीड — संतोष देशमुख हत्याकांडानंतर देखील जिल्ह्याचे नाव गुन्हेगारी मध्ये आजही टॉप वरच आहे.बीडचा बिहार होण्यासाठी अजून थोडी भर आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही होताना दिसत आहेत. बाळराजे दराडे, शिवाजी बंटेवाड सारखी बोटावर मोजण्या इतकी माणसं सोडली तर पोलीस दलाला अवकळा आणण्यात कुणीच मागे नाही. न्यायाचं तराजू झुकलेलं असताना गुन्हेगारी विरोधात अनेक कारवाया करून
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचं नाव चर्चेत आणणं त्या जीवावर आपल्याला एखादा ठाणं मिळावं नाही मिळालं म्हणून एसपींनी पाडलेल्या पायंड्यावर पाऊल टाकावं तसेच राजकारण्यांच्या वळचणीला जावं एवढी मोठी चूक करण्याची गरजच काय होती त्याची शिक्षा दराडेंना मिळायलाच हवी.अशा चर्चांना आता उधाण आला आहे.

जिल्ह्यात दररोज खून, जीव घेणे हल्ले, चोऱ्या दरोडे, अवैध धंदे यांना सुगीचे दिवस आले आहेत.बलात्कार तर रोजच्याच घटना आहेत. सामान्य माणूस झालेल्या अन्यायाची तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात गेला तर तक्रारच घेतली जात नाही. तक्रार घेतली गेलीच तर गुन्हेगारांना मोकळीक कशी मिळणार यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत काय असा प्रश्न देखील भाबड्या जनतेतून चर्चेला जात आहे. न्याय देण्यासाठी राबवलेल्या वेगवेगळ्या संकल्पना नुसत्या शोभेच्याच बनल्या आहेत. इतर सामाजिक प्रश्न मांडायला पत्रकारांना वेळ मिळेल अशी स्थिती जिल्ह्यात राहिली नाही. गुन्हेगारीच्या घटना छापतानाच पांढऱ्या कागदाचे काळे रकाने भरत आहेत. आणखी थोडी भर पडली की बीडचं बिहार व्हायला थोडीशी कसर बाकी आहे. गुन्हेगारी मध्ये जिल्ह्याचा ठसा राज्यात उमटावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.असं असताना स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड असोत की बीड ग्रामीणचे एपीआय बाळराजे दराडे असोत हे कारवाया करून विनाकारण गुन्हेगारावर वचक मिळवायचा प्रयत्न करू लागले आहेत. दराडेंनी तर इतकी मजल मारली की शेकडो किलोमीटर समुद्र असून देखील बीडमध्ये इतिहासात पहिल्यांदाच व्हेल माशाची उलटी जप्त केली. गुटखा कारवाया असो की अन्य गुन्हेगार पकडणं असो अशा गोष्टी करण्याची गरज काय होती. पण त्यांचं मन लालचीच कर्तबगारी दाखवली तर न्याय मिळेल एखाद्या ठाण्याचा कारभार करायला मिळेल अशी भाबडी आशा धरण्याची गरज होती का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
बरं असू द्या पोलीस अधीक्षकांनी चार नोव्हेंबर 2025 ला राजकारण्यांच्या सांगण्यावरून प्रवीण कुमार बांगर यांची शिवाजीनगर बीड , ग्रामीणचे मारुती खेडकर यांना उचलून अशोक मूदीराज यांना बसवले. यावेळी ठाणे बदल करण्यात आला. याच पायंड्याचा वापर कर्तबगारीवर ठाण मिळालं नाही म्हणून दराडे यांनी केला.ठाण्याची खुर्ची मिळावी यासाठी वेगळे मापदंड असतात हे पोलीस खात्यात राहून देखील दराडे ना कळाले नाही. कर्तबगार शब्दाची परिभाषा काळा मानानुसार बदलते हे दराडे सपशेल विसरले. हेच पहा ना माजलगाव मध्ये वाळू प्रकरणात लाच घेतल्यामुळे राहुल सूर्यतळ यांना मुख्यालयाला बोलावून घेतलं. पण चार-पाच दिवसातच चमत्कार घडावा अशी कामगिरी सूर्यतळ यांनी केली. चक्र अशी फिरली की पुन्हा सन्मानाने माजलगाव मध्ये ठाणेदारकी मिळाली.
चकलांब्याचा कर्तव्यदक्ष एपीआय संदीप पाटीलची 50 हजाराची लाच घेताना एसीबीने पकडल्यामुळे विकेट पडली. पकडला म्हणून तो चोर ठरला नाहीतर राजरोस हे धंदे चालू होते. वाळू उपसा होत असल्याच्या हप्ते खोरीच्या बातम्या छापून येत असताना देखील वरिष्ठांकडून कारवाई केली गेली नव्हती. कारवाई केली गेली असती तर जनतेला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग देखील कार्यरत असतो हे कळालं नसतं हे कळावं यासाठी केलेला हा अट्टाहास होता. असं म्हणण्याची वेळ आली आहे. मग या लाचखोर पाटलाच्या जागेवर आपली बदली व्हावी ही अपेक्षा ठेवून पोलीस अधीक्षकांनी राजकारण्यांची खुर्चीसाठी मनधरणी करावी लागते हा पाडलेला पायंडा अमलात आणून दराडेनी लॉबिंग साठी मुंबई गाठली. नेमकं त्याच वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा पवार यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात अचानक भेट देऊन हजेरी घेतली. मग काय दराडे यांनी मुख्यालय सोडण्यासाठी परवानगी घेतली नाही म्हणून चौकशी लावली. उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार या प्रकरणाची चौकशी करून दोन-तीन दिवसात पोलीस अधीक्षकांकडे अहवाल सुपूर्द करणार आहेत. अशा प्रकरणांमध्ये दराडे सारख्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करणं गरजेचच आहे.खरंच बाळराजे दराडे यांना मोह मायेत अडकून शिस्तभंगाचे चाळे करायची गरज होती का? कुठेतरी ठाण्याचा कारभार मिळेल म्हणून गुन्हेगारा विरोधात कारवाई करण्याची गरज आहे का? जिकडे वारं तिकडं उफणायची पद्धती ते कधी अवलंबणार? कर्तबगारी नाही तर चाटुगिरी करावी लागते हे त्यांना कधी समजणार? गुन्हेगारीवर वचक मिळवायचा नाही हे धोरण त्यांना कधी कळणार? असे एक ना अनेक प्रश्न जनतेतून विचारले जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles