मुंबई — धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातून आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी धनगर आरक्षण योद्धे दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर भव्य आंदोलनास सुरुवात झाली आहे.
या आंदोलनासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने धनगर समाजबांधव आझाद मैदानात दाखल झाले असून परिसर दणाणून गेला आहे.
आंदोलन दडपण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू करण्यात आल्या.सकाळी आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, दीपक बोऱ्हाडे यांनाही अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांना चकवा देत दीपक बोऱ्हाडे हे दुपारी थेट आझाद मैदानात पोहोचले. त्यांच्या उपस्थितीनंतर आंदोलनाला अधिक बळ मिळाले असून समाजबांधवांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
दरम्यान, या आंदोलनाला विविध क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून माजी खासदार पद्मश्री विकास महात्मे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अविनाश धायगुडे तसेच धनगर समाजाचे नेते आंदोलनस्थळी उपस्थित राहून धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.
धनगर समाजावर गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाविरोधात हा निर्णायक लढा असल्याचे आंदोलकांचे म्हणणे असून, जोपर्यंत एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. आझाद मैदानावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे.

