Sunday, February 1, 2026

एकाच दिवसात ३० लाख वृक्षलागवडीचा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डचा झब्बा झोल; फट गया सारा ढब्बा ढोल

बीड — हवामान बदल, प्रदूषण आणि जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड केल्याचा गाजावाजा करण्यात आला. या उपक्रमाची “इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये नोंद झाल्याचा अभिमान व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मात्र, या वृक्षलागवडीचा खरा चेहरा वेगळाच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला आहे.
“वृक्षलागवड ही केवळ इव्हेंट म्हणून न करता, तिचे संगोपन व संवर्धन महत्त्वाचे असते. निदान बीड रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील लागवड केलेल्या झाडांची तरी जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्घाटनाच्या झगमगाटानंतर झाडांची दुरवस्था

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड शहरातील पालवण येथील नव्या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार, पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उद्घाटनापूर्वी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य सिमेंट रस्त्याच्या कडेला १२ ते १५ फूट उंचीची झाडे लावण्यात आली होती. मात्र उद्घाटनाचा सोहळा संपताच या झाडांचे संगोपन पूर्णतः दुर्लक्षित करण्यात आले.

आज त्या ठिकाणी अनेक झाडे पाण्याअभावी वाळून गेली, काही मोडून पडली, तर काही झाडे पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांची दिशाभूल?

जिल्हाधिकाऱ्यांनी वर्षभरात १ कोटी रोपे लावण्याचा संकल्प जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात वृक्षसंगोपनाची जबाबदारी झटकली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत पुढील चार वर्षांत १०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र हे स्वप्न फक्त कागदोपत्रीच पूर्ण केले जात असल्याचा आरोप आता पुढे येत आहे.

“इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून सन्मान स्वीकारण्यापेक्षा, जमिनीवर लावलेल्या झाडांचे प्राण वाचवणे अधिक गरजेचे आहे. वृक्षलागवडीचे इव्हेंट करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता तरी प्रत्यक्ष जबाबदारी घ्यावी,” अशी ठाम मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles