सिरसाळा — उसणे दिलेल्या पैशांच्या वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजू गंगाराम उबदे वय 40 वर्ष, रा.सिरसाळा असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
येथील मसनजोगी वस्तीत राहणारे सायलू रामलू पस्तमवाड आणि गंगा पस्तमवाड यांचा संजू उबदे याच्याशी पैशांच्या उसने दिलेल्या दोनशे रुपयाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सायलू आणि गंगा यांनी संजू उबदे यांना पाठीवर जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे संजू यांचा तोल गेला आणि ते तोंडावर जमिनीवर आदळले. यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सिरसाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

