बीड — अडचणीच्या काळात उसने घेतलेले पैसे व्याजासह द्यावेत यासाठी चौघांनी एका तरुणाचे अपहरण करून मुलगा जिवंत हवा असेल तर 50 हजार रुपये टाका नाहीतर मुलगा दिसणार नाही अशी धमकी दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना पकडले आहे ही घटना धारूर तालुक्यात घडली आहे.
धारूर तालुक्यात 10 हजार रुपये उसने घेतले त्याची तब्बल 80 हजार रुपयांची वसुली करत एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली. दरम्यान, आरोपींनी तरुणाच्या आईला फोन करुन धमकी दिल्याचे समोर आले. “मुलगा जिवंत पाहिजे असेल तर 50 हजार पाठवा, नाहीतर तो कधी दिसणार नाही”, अशी धमकी आरोपींनी दिली.
ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून अपहरण झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा मैंद असे आहे. कृष्णाने काही महिन्यांपूर्वी धनराज चाटे, पृथ्वीराज राग आणि परमेश्वर आघाव यांच्याकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते. आरोपींनी या रकमेवर दिवसाला 1 हजार रुपयांचे व्याज लावले होते. याच हिशेबाने व्याजाची रक्कम 80 हजारांवर गेली. पैसे मिळवण्यासाठी कृष्णाचे अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी कृष्णाच्या आईला फोन करून 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर मुलाला सोडणार नाही, अशी धमकी त्या आरोपींनी आईला फोन करुन दिल्याचे म्हटले आहे. तरुणाच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी धारुर पोलिसांनी तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे. तर दोघेजण फरार आहेत. कृष्णा मैंद असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर सध्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

