अशोक खरातने लैंगिक शोषणच नाही तर पाच नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय

नाशिक — महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक असलेल्या भोंदू अशोक खरातला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीत पोलिसांनी खरातवर नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला आहे.यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, कोर्ट परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी भोंदू खरातच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

अशोक भोंदू खरातला कोर्टाने 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपली. त्यामुळे पोलिसांनी आज त्याला पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर केले. त्यात त्यांनी पुन्हा त्याच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. पण बचाव पक्षाने त्याला विरोध केला. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे अशोक खरात 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीतच राहणार आहे. तत्पूर्वी, झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने भोंदू खरातवर एक-दोन नव्हे तर तब्बल 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला.

यासंबंधीच्या माहितीनुसार, एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाचे अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यानी न्यायालयात प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती सांगताना अशोक खरात विषयी अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, आरोपी अशोक खरात महिलांना खडे, पेढे देत होता. त्यांना पाण्यात काही पदार्थ मिसळून ते पिण्यास देत होता. यामुळे महिलांना अस्वस्थ वाटत असे. त्यानंतर तो त्यांचे लैंगिक शोषण करत असे. पोलिसांनी आरोपीच्या फार्म हाऊसमधून पिस्तूल, काडतुसे, रोकड व काही इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त केले आहे.
आरोपीकडे असणाऱ्या एकूण काडतुसांपैकी काही काडतुसे गहाळ आहेत. त्यामुळे त्यांचा कुठे काही वापर झाला का? याचा तपास केला जात आहे. आरोपीने काही विधींमध्ये नरबळी दिल्याचा संशयही आम्हाला आहे.

अशोक खरात आपण सिद्ध पुरुष असल्याचे सांगत लोकांची फसवणूक करत होता. तो नकली साप व वाघ यांचा वापर करून भीती निर्माण करत होता. तो कस्तुरीसारख्या वस्तूंचा वापर करत होता. त्यामुळे त्याने वन्यजीव कायद्याचेही उल्लंघन केल्याचा संशय आहे. परिणामी, या प्रकरणाच्या तपासासाठी आम्हाला त्याच्या आणखी 7 दिवसांच्या कोठडी हवी आहे, अशी मागणी पोलिसांतर्फे सरकारी वकिलांनी केली. पण बचाव पक्षाने त्यावर जोरदार हरकत घेतली. या प्रकरणी आणखी पोलिस कोठडीची गरज नाही. पोलिसांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असून, पुढील तपास आरोपी न्यायालयीन कोठडीत असतानाही होऊ शकतो, असे ते म्हणाले.

त्यावर सरकारी वकिलांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे नमूद करत पुढील तपासासाठी आरोपीची कोठडी आवश्यक असल्याचा पुनरुच्चार केला. ईशान्येश्वर मंदिरातील विधी, आर्थिक व्यवहार व इतर बाबींचा तपास अद्याप बाकी आहे, असे ते म्हणाले. अखेर न्यायालयाने आरोपीवर असणारे गंभीर आरोप व तपासातील नव्या गोष्टी लक्षात घेऊन भोंदू खरातला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अशोक खरात न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना मान खाली घालून उभा होता. तो स्वतःचेच बोट पाहत होता. न्यायालयाने एसआयटी अधिकारी सूर्यवंशी, सरकारी वकील व आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर कोठडी सुनावण्यापूर्वी खरातला ‘तुम्हाला काही बोलायचे आहे का?’, असा प्रश्न केला. त्यावर खरात मोजून 5 वाक्य बोलला. तो म्हणाला, मला साप, वाघ याविषयी काही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. मंदिरात कधीतरी जायचो. त्यावेळी 100 च्या आसपास लोक असायचे. शिवरात्री, श्रावणी सोमवारी आशा वेळी जात होतो. 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरे दिली.

दुसरीकडे, न्यायालयीन सुनावणीनंतर पोलिस अशोक खरातला कडेकोट बंदोबस्तात घेऊन जात होते. यावेळी न्यायालय परिसरात उभ्या असलेल्या जमावाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत खरातला तेथून घेऊन निघून गेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी न्यायालय परिसरात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. मला संधी मिळाली तर मी खरातच्या कानाखाली वाजवेल, असे देसाई यावेळी म्हणाल्या

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles