बीड — मागील काही दिवसांपासून संपूर्ण बीड जिल्ह्यात अखंडित पाऊस पडत आहे. झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिकांबरोबरच पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी गावांना जोडणारे पूल वाहून गेले आहेत. या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासोबत बैठक घेऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात संततधार पाऊस सुरू आहे. बीड जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे बीड मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबत पशुधनाचेही नूकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी गावांना जोडणारे अनेक पूल वाहून गेले आहेत. याबाबत प्रशासकीय स्तरावरून उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानींचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली.
तेलगाव नाका अपघातासंदर्भातही घेतली संबंधित संयुक्त विभागांची बैठक
शनिवारी (दि.१९) रोजी बीड नगर परिषदेचे कर्मचारी शेख बाबू यांचा अपघाती मृत्यू झाला होता. बीड शहरातील तेलगाव रोडवर जलजीवन पाणीपुरवठा योजना आणि रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका तरूणाचाही या रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला होता. आणि आता एका जेष्ठ नागरिकाचा बळी गेला आहे. त्याअनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण व नगरपरिषद यांची संयुक्त बैठक घेऊन पुन्हा एखाद्या नागरिकाचा नाहक बळी जाणार नाही यासाठी उपाययोजना करा. असे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

