गेवराई येथे शोकाकुल वातावरणात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन
गेवराई — अजितदादा पवार हे सामान्य माणसाचे नशीब बदलणारे नेते होते, सगळे व्यवस्थित होत असताना त्यांचे जाणे आम्हा सर्वांना उध्वस्थ करणारे आहे. अजितदादा शेवटच्या घटकाची नोंद करणारे नेते होते, त्यांचे असे अकाली जाणे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. दादांना कुणीही विसरणार नाही. अजितदादा हे या शतकातले जननायक होते अशा भावना माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी भावनिक होऊन व्यक्त केल्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक दु:खद निधनाच्या निमित्ताने गेवराई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सर्पक्षीय नेते उपस्थित होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक दु:खद निधनाच्या निमित्ताने गेवराई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित,
आ. विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख उद्धव मडके, भाजपाचे समन्वयक श्रीकांत सानप, रिपाईचे तालूकाध्यक्ष किशोर कांडेकर, कॉग्रेसचे महेश बेदरे, शरद पवार गटाचे राजेंद्र मोटे, सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे, सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, सावता परिषदेचे दादासाहेब चौधरी, महेश दाभाडे, भाजपचे सचिन दाभाडे, राजेश पवार, राजेंद्र बेदरे, विठ्ठलराव शेळके, शेख खाजा, शितल धोंडरे यांसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण म्हणाले की, अजित दादा कार्यकर्त्यांची काळजी घेणारे नेते होते, विकासकामावर त्यांचे बारीक लक्ष होते. आ. विजयसिंहना त्यांचे सतत मार्गदर्शन होते. कामाचा झपाटा असणारा नेता गेला, त्यांनी केलेला संकल्प आपल्याला पुर्ण करावयाचा आहे. दादांची स्वप्न पुर्ती हीच त्यांना आदरांजली असेल असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी भावनिक होऊन बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, नियती कठोर आणि निर्दयी असते. दादांच्या अपघाताने होत्याचे नव्हते झाले, अजितदादा कर्तृत्ववान होते. लोकांच्या मनातील नेते होते. जाती पातीचा विचार त्यांनी केला नाही, असा नेता आपला पालकमंत्री व्हावा हे आपल्या जिल्ह्याचे भाग्य होते. सगळे चालीजुपीला लागले असताना असे घडणे आम्हला उद्ध्वस्त करुन गेले आहे. अजितदादांकडून शिस्त आणि वक्तशीरपणा आम्ही शिकलो. त्यांना श्रद्धांजलीसाठी शोकसभा घ्यावी असे कधीच वाटले नाही. शेवटच्या घटकाची नोंद करणारे अजितदादा होते. सामान्य लोकांसाठी त्यांचे जाणे दुर्दैवी आहे. दादांना कुणीही विसरणारा नाही. दादा हे या शतकातले जननायक होते असेही ते यावेळी म्हणाले.
आपल्या भावना व्यक्त करताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, ही घटना मनाला चटका लावणारी आहे. आज दादा आपल्यात नाहीत हे मनाला पटत नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर हा मोठा आघात आहे. अतिशय कमी कालावधीत त्यांनी जे केले ते विचार करण्याच्या पलिकडे आहे. अनेक विकासकामे दिली. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मोठे नियोजन त्यांनी केले होते.
यावेळी शोकसभेत बोलताना भाऊसाहेब नाटकर म्हणाले की, दादांचे जाणे आपल्यासाठी दुर्भाग्य आहे, असा नेता पुन्हा होणार नाही. शिवसेना शिदें गटाचे तालुकाप्रमुख उद्धव मडके म्हणाले की, बीड जिल्ह्याला वरदान ठरलेले दादा आता आपल्यात नाहीत हे अतिशय वेदनादायक आहे. आज त्यांच्याबद्द बोलताना शब्द फुटत नाहीत. रिपाईचे तालूकाध्यक्ष किशोर कांडेकर म्हणाले की, दादांचे जाणे सर्वांना वेदना देऊन गेले आहे. ही वेदना सांगण्या पलीकडची आहे. मानवी हक्क अभियानाचे कडुदास कांबळे म्हणाले, अजितदादा हे खुप मोठे व्यक्तीमत्व होते, त्यांच्या जाण्याने खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भाजपाचे समन्वयक श्रीकांत सानप म्हणाले की, अजितदादा यांच्या तोडीचा राज्यात नेता नव्हता, आपला जिल्हा विकासाला मुकला. कॉग्रेसचे महेश बेदरे म्हणाले की, अजितदादाच्या रुपाने एक धाडसी व करारी नेतृत्व हरपले. बीड जिल्ह्याचे हे दुर्दैव. विकासाचे नेतृत्व त्यांच्या माध्यमातून मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेंद्र मोटे म्हणाले की, महाराष्ट्र एका गुणी नेतृत्वाला मुकला. त्यांच्या अकाली निधनानंतर बीड जिल्हा आणि महाराष्ट्र मागे जाणार आहे. अजितदादा हे रिफ्लेसमेंन्टचा विषय नाही, त्यांच्या आदर्शावर आपण चालू हीच त्यांना आदरांजली आहे. गणेश सावंत म्हणाले की, दादा हे राजा मनाचे माणूस होते. दादा कळायला दादांना मरावे लागले. आपण या पुढील काळात काम करुन दादांना आदरांजली आणि दादांचा संकल्प आपण पुर्ण करु. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे, बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार, सौ. शितलताई धोंडरे, गेवराई नगर परिषदेचे गटनेते शेख खाजामामू यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी ऋषिकेश बेदरे, बीड बाजार समितीचे उप सभापती शामराव पडुळे, प्रकाश सुरवसे, परमेश्वर वाघमोडे यांच्यासह सर्वपक्षिय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अजित दादा पवार यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

