बीड — बीडला आले की पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून गुत्तेदारांना मोठ्या थाटात “काम नीट करा”नाहीतर टायर मध्ये घालून मारणार? असं बोलून दादागिरी चा रुबाब दाखवला जातो. हाच रुबाब बीडच्या 13 कोटी रुपये खर्चून नव्या बांधलेल्या बसस्थानकाच्या गुत्तेदाराच्या बाबतीत अमलात आणणार का? उद्घाटनापूर्वीच बीड बस स्थानकाला गळती लागली आहे. त्यामुळे बीडच्या जनतेत संतापाची लाट पसरली आहे.आपले बोल अजित दादा खरेच करून दाखवणार का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
अजित दादा…! तुमच्या बाबतीत बोलल ते तोललं काय? गरजेल ते पडेल काय? ही प्रचलित म्हण बीडकरांना आठवू लागली आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. जुन बस स्टॅन्ड पाडून नव बांधकाम करण्यात आलं. हे बांधकाम जून 2025 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र गुत्तेदाराने नेहमीप्रमाणेच कामात दिरंगाई केली. हरकत नाही केली तर केली. त्यातही बोगसपणाची हरामखोरी केली. काम इतकं निकृष्ट दर्जाचं झालं की उद्घाटनापूर्वीच झालेल्या पावसात छताला गळती लागली. बस स्थानकातील प्रवाशांना छता खाली असताना देखील छत्रीचा आधार घ्यावा लागला. एवढेच नाही तर प्रवाशांची सोय व्हावी यासाठी बस स्थानक तात्पुरत्या सोय म्हणून वापर सुरू केला. मात्र अजूनही बस स्थानक आवारात पथदिवेच चालू नाहीत. एखादा अनुचित प्रकार सायंकाळ नंतर घडलाच तर त्याला जबाबदार कोण? महिला सुरक्षेचा प्रश्न राज्यात गंभीर झालेला असताना पुन्हा तशाच गंभीर प्रकरणांना आमंत्रण द्यायचं का? विशेष म्हणजे बीडचं बस स्थानक या एक महिन्याच्या काळात इतकं नावा रुपाला शिवाजीनगर पोलिसांनी आणला आहे की, प्रवासी लुटला नाही असा एकही दिवस जात नाही. कर्तव्यदक्ष शिवाजीनगर पोलिसांनी अख्ख बस स्थानक चोरांना अंदण दिलं आहे. दिवसाढवळ्या महिला व पुरुषांच्या गळ्यातलं सोन चोरीला जात असेल. खिसे कापले जात असतील पोलिसांकडून उलट तपासणी ज्याच सोनं चोरीला गेला आहे. ज्याचा खिसा कापला गेला आहे. त्याचीच केली जात असेल तर फिर्याद द्यायला पुढे कोण होणार? असा प्रश्न निर्माण होतोय. दिवसा जर हे बस स्थानक तुमच्या पोलिसांच्या जोरावर असुरक्षित असेल तर रात्रीच्या वेळी प्रवाशांची काय स्थिती होऊ शकते याचा एकदा तरी विचार करा.
बरं इतकच नाही तर बीड बस स्थानकाच्या स्वच्छतेचे देखील दयनीय अवस्था आहे. स्वच्छता गृह बांधली आहेत. पण ती सभोवताली पत्रे लावून बंदिस्त केली आहेत. मग प्रवाशांनी अडोसा गाठूनच नैसर्गिक विधीचा कार्यक्रम उरकायचा का? उद्घाटनापूर्वीच बसस्थानकाला गळती लागत असेल तर तुम्ही बीडमध्ये बोगस काम केलेले आढळल्यास टायर मध्ये घालून मी मारणार असा दम गुत्तेदारांना दिला होता. आता त्या शब्दाची अंमलबजावणी करणार का? गुत्तेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार का? दंडात्मक कारवाई करून सरकारने केलेल्या खर्चाची भरपाई त्या गुत्तेदाराकडून करून घेणार का? की “बोलाचाच भात बोलाचीच कढी ” या म्हणीची प्रचिती बीडकरांना देणार? असे एक ना अनेक प्रश्न बीडच्या जनतेतून विचारले जात आहेत.
आंदोलनाचा इशारा
गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे बसस्थानकाचे छप्पर आणि पत्रे उघड्यावर आले आहेत. संबंधित विभागीय नियंत्रक व अभियंत्यांनी याकडे लक्ष न दिल्याचे स्पष्ट होत असून, गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार सादर करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.अजितदादा पवार “कामाचा गुणवत्ता दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे, निकृष्ट काम करणाऱ्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल” असा इशारा दिला होता. मात्र, एवढ्या कोटींचा खर्च करून बांधलेल्या बसस्थानकात उद्घाटनाआधीच गळती लागल्याने, पालकमंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

