चौसाळा — बीड तालुक्यातील अंजनवती गावातील पोष्ट मास्तर भाऊसाहेब शिवलिंग शेटे यांनी बनावट पासबुक तयार करून चौसाळा उप डाकघरातील कार्यालयात पैसे जमा न करता जवळपास ५० लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप अंजनवती आणि घारगाव येथील ग्रामस्थांनी केला असुन यामध्ये रॅकेट कार्यरत असुन चौसाळा डाकघरातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्वांचीच सखोल चौकशी करून गोरगरिबांच्या खात्यावरील पैसे परत करावेत अशी मागणी सरपंच कैलास येडे,रेवण येडे, वैभव येडे, सुधीर सोनवणे, महादेव माळी,बाळु शिंदे,मारोती वारकरी, बन्सी शिंदे आदींनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाऊसाहेब शेटे याने बनावट पासबुक तयार करून जनतेसह पोस्ट खात्याची फसवणूक केली. या प्रकरणात फसवणूक झालेले अनेक जण आपली कैफियत मांडू लागले आहेत.मालक वारल्यानंतर , मेंढ्या सांभाळणं होईना मग त्या विकुन दीड लाख रुपये पोस्टात टाकले. बटईने दिलेल्या जमिनीतुन मिळणाऱ्या पैशातून पोटापाण्याचं भागतं. काल गावात कालवा झाला तेव्हा कळलं पोष्ट मास्तरनं घोटाळा केलाय.आता आम्ही काय करावं असा प्रश्न ७५ वर्षीय अनुसया कोंडिबा कर्डुले हताश होऊन विचारताहेत.अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे पपिता प्रभाकर थोरात, मुक्ताबाई श्यामराव सोनावणे यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या आखत्यारीत पोस्ट खाता येत असल्याने याची विश्वासाहर्ता होती म्हणून गोर गरीब शेतमजुर यांनी पोष्टात पैसे जमा केले.२ वर्षांपूर्वी भाऊसाहेब शेटे पोष्ट मास्तर म्हणुन आल्यावर गोंधळ सुरू झाला. एका माणसाचे काम नसुन चौसाळा डाकघरातील अधिकारी व कर्मचारी यांचा सुद्धा यामध्ये सहभाग असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाई करावी आणि खातेदारांचे पैसे परत करावेत अशी मागणी सरपंच कैलास येडे यांनी केली आहे.
चौसाळा डाकघराचे निरीक्षक जाकोरे यांनी अंजनवती गावात ग्रामस्थांशी चर्चा करत.खातेदारांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्याचे पुरावे द्या पुढील कारवाई करण्यात येईल तसेच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.असे जाकोरे यांनी सांगितले.

