बीड — मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व अवादा पवन ऊर्जा कंपनी खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडला अटक करण्यात यावी अशी एकीकडे मागणी होत आहे.दुसरीकडे मात्र वाल्मीक कराडावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी मयुरी विजयसिंह बांगर उपोषणाला बसल्या आहेत
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा दावा केला जात असून त्याच्या अटकेसाठी सीआयडीकडून शोध सुरु आहे. बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता वाल्मिक कराडच्या समर्थनात उपोषण करण्यात येत आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयुरी विजयसिंह बांगर या उपोषण करत आहेत.
वाल्मिक कराडवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा दावा मयुरी विजयसिंह बांगर यांनी केला आहे. “राजकीय द्वेषातून हे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर जी चिखलफेक करण्यात येत आहे ती थांबवली पाहिजे. वाल्मिक कराड यांच्यावर असलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. आरोप खरे असतील तर त्यावर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुम्ही पुराव्याशिवाय अण्णांवर चिखलफेक कशी करु शकता त्यांचा हा खरा चेहरा नाही. त्यांनी खूप समाजकार्य केले असून अनेक भगिनींचे कल्याण केले आहे. माझ्या सारखे अनेकजण त्यांच्यासाठी आवाज उठवू पाहत आहेत,” असं उपोषणकर्त्या मयुरी विजयसिंह बांगर यांनी म्हटलं आहे.

