छत्रपती संभाजीनगर — मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने नुकतेच जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान मराठा आरक्षणाची लढाई सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगर मध्ये एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपली जीवन यात्रा संपवली
सिल्लोड येथे एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीव दिला आहे. शेततळ्यात उडी मारून त्याने आत्महत्या केली. समाधान रायभान काळे (वय ३८ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. समाधान याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी सरकारकडून फसवणूक होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे.
समाधान काळे या तरुणाचे बारावीपर्यंत शिक्षण झालं असून तो सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील रहिवासी होता. समाधान याने शनिवारी गावाजवळील शेततळ्यात उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. त्याच्याजवळ पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे. या आत्महत्येनं तरी सरकारचे डोळे उघडतील, अशी आशा त्यांनी चिठ्ठीत व्यक्त केली आहे.
तरुणाकडे सापडलेल्या चिठ्ठीत म्हटले की, सततची नापिकी आणि शेकडो मोर्चे-आंदोलनं करुन देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे. या सगळ्याला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. या आत्महत्येनं तरी सरकारने डोळे उघडावेत. गरजवंत मराठा समाजाला आता तरी शासनाने न्याय द्यावा. एक मराठा लाख मराठा, असं चिठ्ठी लिहून समाधानने आपलं जीवन संपवलं आहे.