Thursday, November 21, 2024
Home Blog

धर्मापुरी मतदान केंद्रावर राडा; मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

0

परळी — मतदार संघातील धर्मापुरी येथे मतदान केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी उघडकीस आणला.

लोकसभा निवडणुकीत देखील परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. हीच बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने यावेळी असे प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घेतली आहे. मात्र धर्मापुरी येथील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवून त्याचे कनेक्शन कट करण्यात आले. ही बाब महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी उघडकीस आणला. त्यानंतर राजेसाहेब देशमुख त्यांचे समर्थक व धर्मापुरीतील विरोधी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी राजसाहेब देशमुख यांनी मतदान प्रक्रिया बंद ठेवण्यास सांगितले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा पूर्ववत सुरू केल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मात्र जिल्ह्यात खळबळ माजली आहे

नमिता मुंदडा यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा — अक्षय मुंदडा

0

केज — केज मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी केलेली विकास कामे लक्षात घेऊन जनतेने मोठ्या माताधिक्याने विजयी करावे असे आवाहन अक्षय मुंदडा यांनी केले आहे.

भाजपाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी केज मतदार संघात विकास काम राबवून जनतेशी बांधीलकी जोपासलेली आहे. रस्ते विकास ,वीज, पाणी, व्यापार, आरोग्य यासारख्या मूलभूत गोष्टींवर जास्त भर देत विकास करण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात देखील आमदार म्हणून त्या जनतेची काम करण्यास तत्पर राहतील यात शंका नाही. त्यांनी केलेली विकास काम लक्षात घेऊन जनतेने मतदान रुपी दान त्यांच्या पदरात टाकावे. नमिता मुंदडा यांना मोठ्या माताधिक्याने विजय करावे असे आवाहन अक्षय मुंदडा यांनी केले आहे.

गेवराईत इतिहास घडणार; विकासाच्या विजयपर्वाकडे वाटचाल

0

विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याचा गेवराई विधानसभा मतदारसंघाचा निर्धार
गेवराई  — भाजप शिवसेना रिपाई राष्ट्रवादी काँग्रेस महायुती मित्र पक्षाचे लोकप्रिय उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे आणि न भूतो न भविष्यती अशी सभा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रचंड जनसागर लाभलेली प्रचार सभा संपन्न झाल्याने. तालुकाभरातील मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. गेवराईचा आमदार विजयसिंह पंडित यांच्या रूपाने फिक्स झाल्याने विरोधक आजी-माजी आमदारांचा करेक्ट कार्यक्रम झाल्यामुळे त्यांनी प्रचार खर्चावर नियंत्रण ठेवले असून त्यांच्या प्रचार यंत्रणा थंड पडल्या आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की, विधानसभा निवडणूक प्रचारापूर्वीच गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित यांनी आपल्या प्रचार कार्याची तयारी सुरू केली होती. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काठावर पराभवाचा सामना केल्यानंतर नाउमेद न होता आणि पराभवाची कारणे न शोधत बसता नव्या जोमाने ते जनतेत जाऊन आपल्या कामाला सुरुवात केली होती. पद- सत्ता नसताना देखील जनसामान्यांच्या अडीअडचणीला धावून गेले. कोविड सारख्या महाभयंकर महामारीच्या संकटात शिवछत्र परिवाराने विविध ठिकाणी रुग्णांसाठी कोविड सेंटर स्वखर्चाने उभारून अनेकांना जीवदान दिले. शारदा प्रतिष्ठान मार्फत व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून दिल्या ही कामे विजयसिंह पंडित यांच्या जमेची बाजू ठरणार आहेत. विजयसिंह पंडित यांनी संपूर्ण मतदारसंघ यापूर्वीच पिंजून काढला होता. मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत ते पोहोचले होते कारण त्यांना ठाऊक होते आगामी काळात आपणच उमेदवार असणार आहोत. त्यांच्या प्रचार कार्याचे फारसे गांभीर्य आजी-माजी आमदारांनी घेतले नसावे. ऐनवेळी तू-का मी या विवंचनेत शेवटपर्यंत गाफील राहिले तर विजयसिंह पंडित हे जोमाने प्रचार कार्यात सक्रिय राहिले.

महायुती मित्र पक्षाचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ चकलांबा येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी मोठी प्रचार सभा घेऊन युतीधर्म पाळा कमळ समजून घड्याळाला विजयी करण्याचे भावनिक आवाहन करून भाजपाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी लावली. त्याच पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची प्रचंड अशी न भूतो न भविष्यती प्रचार सभा संपन्न झाली या सभेला मोठा जनसागर लोटला होता ही गर्दी पाहून भारावून गेलेले अजित दादा यांनी जाहीर संकेतच दिले. तुम्ही विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करा मी त्यांच्या पाठीमागे राज्याची ताकद उभी करतो.याचाच अर्थ सत्तेत त्यांना वाटा देऊ असा होतो. दरम्यान दोन्ही सभांनी मतदारांमधून प्रचंड नवचैतन्य निर्माण झाले आहे तर हा धसका घेतल्याने विरोधकांनी आपल्या प्रचारावर नियंत्रण ठेवल्याने त्यांची प्रचार यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लाडक्या बहिणी योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभ्या — डॉ .सारिका क्षीरसागर

0

बीड — बीड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल ९८ हजार महिलांना मिळाला आहे. या या लाडक्या बहिणी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. लाडक्या बहिणींचा मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर हे मोठ्या मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, लोकनेत्या स्व.केशरकाकू यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा वसा आणि वारसा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी उत्तमरित्या सांभाळला आहे. हेच क्षीरसागर कुटुंबाचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न डॉ.योगेश हे करत आहेत. ५ वर्षात विरोधकांना जे जमले नाही, ते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी कुठलेही महत्त्वाचे पद नसताना अवघ्या एकाच वर्षात साध्य करून दाखवले. आमदार फंडाइतका निधी काही महिन्यातच खेचून आणला. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात स्वयंरोजगार, अविरत आरोग्य सेवा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम, महिला, तरुण, शेतकऱ्याच्या योजना तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहचविणे, असे अनेक उपक्रम राबविले. त्यांनी कधीही जातपात, धर्म या मुद्द्याकडे लक्ष दिले नाही. २४ तास लोकांमध्ये राहून विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली आहेत. बीड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल ९८ हजार महिलांना मिळाला आहे, हा लाभ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिवसेना, रिपाइं अशा महायुतीच्या सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद पाहता बीड विधानसभा मतदारसंघातून डॉ.योगेश क्षीरसागर हे मोठ्या मताधिक्याने विजय होतील. त्यांना लाडक्या बहिणीच विधानसभेत पाठवतील, असा विश्वास डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, डॉ.योगेश क्षीरसागर यांना मतदान करून बीड मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर आणण्याची संधी माय-बाप जनेतेने द्यावी, असे आवाहन डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी दिले आहे.

संदीप क्षीरसागर चुलत्याच्या मताधिक्याचा विक्रम मोडीत काढणार!

0

बीड — विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं प्रचंड बदलली असून संदीप क्षीरसागर प्रचंड मतांनी विजयी होतील अस चित्र निर्माण झाला आहे. 2009 च्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांचे चुलते जयदत्त क्षीरसागर यांनी 70 हजाराहून अधिक मताधिक्य मिळवत दणदणीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांचा हा विक्रम संदीप क्षीरसागर मोडीत काढणार असल्याचं सध्याच्या परिस्थितीवरून तरी दिसत आहे.

मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत गेला तस तसं राजकीय समीकरणं बदलू लागली. अजित पवार गटातील राष्ट्रवादी चे डॉ.योगेश क्षीरसागर यांना काही प्रमाणात अनुकूल असणारे वातावरण होते. त्यामुळे दोन्ही भावात होणारी लढाई चुरशीची होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मनोज जरांगे पाटील बीडला येऊन गेल्यानंतर प्रतिकूल बनू लागले. मराठा समाजामध्ये उमेदवार जातीचा असल्यामुळे निर्माण झालेला संभ्रम जरांगे पाटलामुळे दूर झाला गेला. त्यामुळे नेहमीच मराठा आरक्षणाला साथ देणाऱ्या संदीप क्षीरसागर यांना मतदारांचा कौल अनुकूल बनला. लोकसभेचा निवडणूक निकाल बदलवण्यात कारणीभूत ठरलेल्या बालाघाटावर तर संदीप क्षीरसागर यांच्यासाठी एकतर्फी परिस्थिती अनुकूल बनू लागली. पूर्वीपासूनच भाजप विरोधात असलेला मुस्लिम समाज देखील संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू लागला.ओबीसी मतदार हे दोन्हीही उमेदवार ओबीसी असल्याने काही प्रमाणात विभागला गेला असला तरी, संदीप क्षीरसागर यांना तो जास्त प्रमाणात पूर्वीपासूनच झुकलेला आहे. एकंदरच बीड मतदार संघाची परिस्थिती पाहता यापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी 2009 च्या निवडणुकीत एक लाखाहून अधिक मतदान पदरात पाडून जवळपास 70 हजाराची आघाडी घेतलेली होती. तीच स्थिती पुन्हा संदीप क्षीरसागर यांच्या बाबतीत निर्माण झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. या निवडणुकीत संदीप क्षीरसागर आपले चुलते जयदत्त क्षीरसागर यांचा मताधिक्याचा विक्रम मोडीत काढतील असं जनतेतून बोललं जात आहे.

नमिता मुंदडांनी केलेल्या रस्त्यामुळे विकासाला मिळाली गती; विरोधकांची खूंटली मती

0

केज — विकासाला गती मिळावी यासाठी चांगल्या रस्त्यांची आवश्यकता असते ही बाब लक्षात घेऊन निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नमिता मुंदडा यांनी नगरोधान योजनेच्या माध्यमातून 76 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. केजकरांच्या विकासालाच चालना रस्त्यामुळे मिळाली नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील ही बाब महत्त्वाची ठरल्याने या निवडणुकीत त्यांच पारड जड आहे.

प्रचंड धूळ, रस्त्यावरील खड्डे यामुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या यामुळे केजचा व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला होता. यावर तोडगा काढण्यासाठी व व्यापारी ,जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेल्या वर्षी खा. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नमिता मुंदडा यांनी व्यापारी वकील, शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची संवाद बैठक बोलावली. त्यामध्ये रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात व्यापक चर्चा करण्यात आली. मुख्य बाजारपेठ असलेल्या मंगळवार पेठ कानडी रोड ची दुरावस्था अतिशय वाईट झाली होती. हे रस्ते नव्याने तयार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याला प्रतिसाद देत वर्षभरात रस्ते पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन नमिता मुंदडा यांनी दिलं. नुसतं आश्वासन दिलं नाही तर आपला शब्द खरा करण्यासाठी शासन दरबारी नमिता मुंदडा यांनी प्रयत्न केले. नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून 76 कोटींचा निधी मिळवला. नुसता मिळवला नाही तर रस्त्यांची काम मोठ्या धडाक्यात सुरू केली. गेल्या आठ महिन्यापासून सुरू असलेल्या उमरी रोड मंगळवार पेठ नगरपंचायत ते पोस्ट ऑफिस नगरपंचायत चे टिपू सुलतान रोड ही कामे पूर्णत्वास नेली. दिलेल्या शब्दांची पूर्तता करताना नमिता मुंदडा यांनी दळणवळणाला नवी गती मिळवून दिली. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या जनतेला भेडसावणार नाहीत. खड्ड्यातून जाण्याची वेळ येणार नाही. याबरोबरच धुळीचे साम्राज्य देखील नाहीस करण्यात मुंदडा यांनी यश मिळवलं. नुसत्या नगरोत्थान योजनेतून शहराचा कायापालट केला नाही तर पानंद रस्ता योजनेतून गावातील शेतकऱ्यांच्या विकासाला नवी गती देण्याचा काम मुंदडा यांनी केलं. खेड्यापाड्यात देखील रस्त्यांचं जाळं उभा करताना सत्ताधारी पक्षातील आमदार म्हणून जितकं वजन वापरता येईल तितकं वापरलं त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघ आज प्रगतीची नवी फळ चाखत आहे. या नमिता मुंदडा यांच्या जमेच्या बाजू असल्याने विरोधकांना विरोध करताना अनेक ठिकाणी तोंड घशी पडावं लागलं आहे. त्यामुळे ही निवडणूक नमिता मुंदडा यांच्यासाठी औपचारिकता ठरत आहे.

माझी निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची — संदीप क्षीरसागर

0

तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा:आ.संदीप क्षीरसागर यांचे आवाहन

बीडच्या विकासासाठी संदीपभैय्यांना प्रचंड मतांनी विजयी करा- खा. बजरंग सोनवणे

विरोधकांना धडकी भरवणाऱ्या चौसाळ्यातील विराट विजयी संकल्प सभेने आ.संदीप क्षीरसागर यांच्या विजयावर केले शिक्कामोर्तब

चौसाळा — माझी ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे.बालाघाटवरील मतदारांनी प्रचाराच्या शेवटची विजयी सभा घेऊन मला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे उद्याच्या २० नोव्हेंबरला आपण सर्व मायबाप जनतेने बीड मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अनुक्रमांक ३ “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले तर बीड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची विचारधारा सर्व मतदारांना आपलेसे करणारी आहे.मतदारसंघात ठिकठिकाणी आ. संदीप क्षीरसागर यांना जनतेने स्वीकारले असून आपण सर्वांनी जनसेवेसाठी कायम उपलब्ध असणाऱ्या आ. संदीप भैय्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे बीड विधानसभेचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ सोमवारी दुपारी चौसाळा येथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला खासदार बजरंग सोनवणे, माजी आमदार सुनील धांडे, उमेदवार आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह बालाघाटावरील राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि चौसाळा जि. प.गटातील मतदार बंधू,भगिनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आ. संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत माझ्या प्रचारानिमित्त चौसाळा येथे भव्य विजयी संकल्प सभा पार पडत असल्याचा आणि आपण सर्वांनी इतक्या विराट संख्येने या सभेला दर्शवलेल्या उपस्थितीवरून मला समाधान वाटत आहे. मागील पाच वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने काम केले नागरिकांचे प्रश्न सोडवले.शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा उभारली. याचेच फळ म्हणून आज ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची झालेले असताना तुम्ही सर्वजण माझ्यासोबत खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आहात. या सभेला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते, वयस्कर मंडळी तसेच कार्यकर्ते, माता भगिनींनी दाखवलेली अलोट गर्दी विरोधकांची धडकी भरवणारी असेल हे नक्की.मायबाप जनतेची झालेली ही अफाट गर्दीच, माझी निवडणूक जनतेने हाती घेतली असल्याचे सांगून जाते. आता येत्या २० तारखेला अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रचंड जनसमुदायासमोर केले.

उपस्थितांशी संवाद साधताना खासदार बजरंग सोनवणे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यशैलीचे आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामाचे कौतुक करत मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवावे असे आवाहन केले.यावेळी इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही मनोगत व्यक्त करत संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी मतदार खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला.

कार्यकर्त्यावर आता खेटरं राखण्याची वेळ; चप्पल आचारसंहितेच्या कचाट्यात?

0

धाराशिव –जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार गुरुदास संभाजी कांबळे यांनी चर्चेला नवे तोंड फोडले आहे.त्यांनी स्वत:च्याच निवडणूक चिन्हाबद्दल केलेल्या मागणीवरुन सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या अपक्ष उमेदवाराचं चिन्ह आहे चप्पल. विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलं आहे. यावेळी कांबळे यांनी निवडणूक आयोगाकडे वेगळीच मागणी केली आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतरावर चप्पल घालायला बंदी करा, अशी मागणी या उमेदवाराने केली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळ निवडणूक प्रचार आणि प्रसार करण्यास बंदी असते. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी संभाजी कांबळे स्वत:चं निवडणूक चिन्हाबद्दल ही मागणी केली आहे.

कांबळेंनी सांगितलं की, मतदारांना बाहेरच चप्पल ठेऊन यायला सांगा. ते चप्पल घालून आले तर माझ्या निवडणूक चिन्हाचा प्रचार होऊन आचारसंहितेचा भंग होईल. कांबळे यांनी मतदारांच्या पायाला दुखापत होऊ नये म्हणून मतदान केंद्रापर्यंत गालिचे अंथरण्याची देखील मागणी देखील केली आहे. याशिवाय मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी यांनी देखील चप्पल बाहेर काढून याव्यात अशी कांबळे यांची मागणी आहे. त्याबाबत रीतसर लेखी मागणीच त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. आता निवडणूक अधिकारी यावर काय भूमिका घेतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर ही मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केली तर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदानासाठी आधी स्वतःच्या चपला झिजवाव्या लागल्या आता मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांच्या चपला राखण्याची वेळ येणार आहे.
अशी आहे कांबळे यांची मागणी
मतदान केंद्राच्या दोनशे मीटर अंतरात चप्पल घालायला बंदी करा
मतदान कर्मचारी, अधिकारी यांच्या चप्पल ही बाहेर काढून ठेवा
चप्पल या निवडणूक चिन्हाचा प्रसार होऊ नये म्हणून आयोगाकडे लेखी मागणी

जातीपातीचे राजकारण सोडून विजयराजेंना प्रचंड मताने निवडून द्या- ना. धनंजय मुंडे

0

उमापूर येथील सभेमध्ये विजयसिंह पंडित यांच्या विजयावर शिक्कामोर्तब
गेवराई — लोकसभेला झाले ते चुकीचे झाले. आम्ही कधी जातीपातीचे राजकारण केलेले नाही. जातीपातीच्या राजकारणामुळे येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य बरबाद होणार आहे. लोकसभेचा पराभव लक्षात ठेवून मतदान केले, तर आपले मत विभाजन होऊन याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. महाविकास आघाडीचा फायदा म्हणजे धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे, अमरसिंह पंडित या सर्वांचेच नुकसानच आहे तेव्हा जातीपातीचा आणि किंतू परंतु चा विचार न करता महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांनी केले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित उमापूर येथील सभेमध्ये बोलत होते.

यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुरेश हात्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मूजीब पठाण, आरपीआय कवाडे गटाचे अनिल तुरूकमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गेवराई तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश सुरवसे, अशोक हिंगे, जेष्ठ नेते आप्पासाहेब औटी, महेश रावडे, श्रीकांत सानप, उद्धव खाडे, जालिंदर पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी मुंडेची अवलाद आहे. मुंडेंची अवलाद अंधारामध्ये काही निर्णय घेत नाही. आम्ही जो निर्णय घेतो तो स्पष्ट असतो आणि आमचा निर्णय म्हणजे विजयराजे पंडित यांना आमदार करण्याचा आहे. यासाठी पंकजाताई मुंडे, मी व भैय्यासाहेब मिळून विजयराजे यांना आमदार करू. २००२ ला मी व भैय्यासाहेब जिल्हा परिषद सदस्य असताना असलेली मैत्री कायम आहे. मी त्यांना तेंव्हापासून ओळखतो. तालुक्याच्या विकासाचे स्वप्न ऊराशी बाळगुन हा माणूस अविरत कार्यरत आहे. आपल्या छोट्या भावाला आमदार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करतोय. असे बंधुप्रेम विरळच असते. भैयासाहेब मी तुम्हाला शब्द देतो विजय राजे उद्याच्या 23 तारखेला आमदार असतील आणि गुलाल आपलाच असेल, उपस्थितांचे चेहरे पाहता विजयसिंह पंडित यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने विविध समाजासाठी महामंडळे सुरू करून वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. सुरू केलेल्या विविध योजना पुढील काळात चालू ठेवायच्या असतील तर महायुतीचे सरकार निवडून देणे आवश्यक आहे, यासाठी विजयसिंह पंडित यांना आशीर्वाद द्या.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, गेवराई विधानसभा मतदारसंघ पाणीदार करणे हे आमचे ध्येय आहे, त्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत, विरोधक मात्र केलेल्या कामावर न बोलता माझ्यावर व माझ्या परिवारावर टिका करत आहेत, आम्ही त्याला भिक घालत नाही. आम्हाला लोकांची साथ आहे. विजयसिंह पंडित यांना विजयी करून राज्याच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी सभापती मुजीब पठाण अशोक हिंगे, आप्पासाहेब औटी यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेला पंचक्रोशतील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये झालेली ही जाहीर सभा या जाहीर सभेने विजयसिंह पंडित यांच्या प्रचाराची सांगता झाली. सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ना. धनंजय मुंडे यांच्या सभेने विजयसिंह पंडित यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विजयसिंह पंडित यांना

गुरव महासंघाचा पाठींबा
महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा महासंघाचे अध्यक्ष राजेश गवळी, सचिव रंगनाथ मोकाशी यांनी केली.राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महासंघाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. याप्रसंगी
प्रदीप गवळी, अमोल दायमा, राजेंद्र माने,
वैभव चिंचोलकर, राजू गावडे यांच्यासह राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

बीडला विकासाच्या वाटेवर आणण्याची संधी द्या — डॉ. योगेश क्षीरसागर

0

बीड — प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणच्या सभांना प्रचंड गर्दी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिवसेना, रिपाइंसह मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात झोकून दिल्याने अनेक कॉर्नर बैठका, रॅली, प्रचार सभांना गर्दी होत होती. त्यामुळे विरोधकांना धडकी भरल्याचे चित्र बीड विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले आहे.

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गेल्या वर्षभरापासून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यामुळे बूथवर सक्षम यंत्रणा उभारण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मतदारसंघातील ग्रामीण भागाचा निवडणुकीच्या दौरा केला होता. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागाचा प्रचार वेळेत पूर्ण करून शहरात लक्ष घातले होते. त्यांच्या प्रचाराची धुरा मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या ताकदीने सांभाळली. प्रत्येक मित्र पक्षाने मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे भरगच्च मेळावे घेतले. प्रचाराच्या पूर्वसंध्येला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांजरसुंबा (ता.बीड) येथे मेळावा घेतला. यावेळी ऊसतोड कामगार, बालाघाटवरील जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील गांधीनगर, मोमीनपुरा भागात प्रचंड सभा झाल्या. या दोन्ही सभांमुळे अल्पसंख्याक समाजाला गृहीत धरणाऱ्यांचे टेन्शन वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते. तिकडे शहरात पेठ बीड भागात रिपाइंचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी मतदारसंघाचा मेळावा घेतला. तसेच, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती धर्म पाळत युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये प्रचंड गर्दीचा मेळावा पार पाडला. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पेठ बीड भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या गर्दीच्या प्रचार मेळावे, सभांमधून महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या घड्याळाचा गजर सर्वत्र होताना दिसून येत आहे.

दुर्दैवाने जात-पात, धर्माच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली जात आहे. आपण कायम विकासाच्या मुद्द्यावर काम करत आलो. त्यामुळे बीडच्या सुज्ञ जनतेने मतदान करताना माझा विचार जरूर करावा. मतदारसंघाला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मला सेवेची एक संधी द्यावी.

   —    डॉ.योगेश क्षीरसागर, महायुतीचे उमेदवार.