महाराष्ट्र

देशमुख साहेब …! रिकाम्या खुर्च्यांच आत्मपरीक्षण करणार की नाही?

बीड  — संघटना कोणतीही असो, ती वाढते, फुलते ती त्यातील सभासदांच्या जोरावर, हे सभासद जो पर्यंत एखाद्याला आपला नेता मानतात तोवरच त्या नेतृत्वाला देखील अर्थ असतो. पण एकदा का आपल्या सभासदांचा म्हणा किंवा संघटना ज्यांच्यासाठी आहे त्या घटकांचा म्हणा विश्वास नेता म्हणविणाराने गमावला की मग लोक संघटनेकडे पाठ फिरवतात आणि नेता म्हणविणारांना रिकाम्या खुर्च्यांची शोभा पहावी लागते. बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेच्या मराठवाडा स्तरीय म्हणून गाजावाजा केलेल्या मेळाव्यात हीच शोभा झाली. या मेळाव्याच्या सभागृहातील रिकाम्या खुर्च्यांचे आत्मपरीक्षण देशमुख करणार आहेत का? संघटनेच्या जोरावर आमदारकीचे डोहाळे लागलेल्यांना खरा पत्रकार म्हणजे कोणाची ‘देशमुखी’ नाही हेच रिकाम्या खुर्च्यांनी दाखवून दिले आहे.

पत्रकारांच्या संघटना आणि त्यामधलं राजकारण यावर अनेकदा बोललं जातं, संघटना असाव्यात का आणि या संघटना सामान्य पत्रकारांसाठी काय करतात हा वेगळाच विषय आहे. स्वत:ला पत्रकारांची मातृसंस्था म्हणविणारे लोक मोजक्याच दहा पाच टाळक्यांना घेऊन इतरांना ‘येरेगबाळे’ म्हणून हिणवण्यातच धन्यता मानीत आले आहेत, आणि म्हणूनच मातृसंस्था म्हणविणाऱ्यांच्या विभागीय मेळाव्यात तीन चारशे खुर्च्या सुध्दा भरत नाहीत, त्यातल्या अर्ध्याच्या वर रिकाम्या राहतात हे सर्वांनी पाहिले आहे. आम्ही म्हणजेच पत्रकारांची ताकत असे सोंग उभे करुन त्याच्या आडून आमदारकीच्या कळा आणणारांच्या मागे खरच किती पत्रकार आहेत हेच आता अधिकारी, पुढारी आणि सर्वांनाच कळले आहे.


जे व्हायच होतं ते झालं, सोंग उघड पडलच आहे, पण हे का झालं याचं आता तरी आत्मपरीक्षण करणार का? स्वत:ला मातृसंस्थेचे सर्वेसर्वा म्हणून घेणाऱ्या देशमुखांच्या स्वत:च्या जिल्हयात पत्रकारांमध्ये यांचा संपर्क काय? मागच्या १५-२० वर्षापासून जिल्हयात पत्रकारिता करणाऱ्या किती बहुजन, फिल्डवरच्या पत्रकारांना देशमुख ओळखतात? पत्रकारितेच ज्यांच वर्तुळच दहा पाच टाळक्यांपलीकडे जात नाही, त्यांच्या परिघात शेवटचा पत्रकार कधी येणार? ग्रामीण भागातल्या, स्थानिक दैनिकातल्या, साप्ताहिकातल्या पत्रकारांना यांनी कधी विश्वास आणि आधार दिला? आज सोशल मीडिया हे प्रभावी प्रसारमाध्यम असताना सोशल मीडियाला बोगस म्हणणारे लोक जर तुमच्या सोबत असतील तर तुमच्याबद्दल सामान्य पत्रकारांना प्रेम वाटणार कसं? देशमुख हे पत्रकारांचे राज्याचे नेते होते. गावपातळीपासूनचे पत्रकार त्यांना आमचा नेता म्हणायचे म्हणून ते नेते होते, पण या गावपातळीवरच्या पत्रकारावर अन्याय झाल्यास देशमुख आणि त्यांच्या संघटनेने काय केले? निवेदन द्यायला सोबत आल्यानंतर पुन्हा अधिकाऱ्यांना फोन करुन ‘आम्ही नाईलाज म्हणून आलो होतो, आमचं काही म्हणन नाही’असली लाळघोटी वृत्ती संघटनेत कोणी पोसली? अन असल्यांच्या जोरावर कोणाला आमदार व्हायच असेल तर पत्रकार ते कसं सहन करतील. पत्रकारांना सगळयांच राजकारण कळतं मग आपला वापर करुन मोजक्याच टाळक्यांची देशमुखी चालतेय हे कधी तरी कळणारच ना… आणि ते समजल्यावर काय होतं हे मेळाव्यातल्या रिकाम्या खुर्च्यांनी दाखवून दिलयं. आता तरी देशमुख आत्मपरीक्षण करणार का? तुम्ही पत्रकारांसाठी नसाल तर पत्रकार तुमच्याकडे पाठ फिरवणारच… खरतर तुमच्या स्वत:च्या जिल्ह्याने तुमच्यामागे एकमुखाने उभं रहायला पाहिजे होतं, पण तुम्ही मुठभर कोंडाळयातून बाहेर आलाच नाहीत, खरी पत्रकारिता करणारे, फिल्डवरचे लोक तुम्हाला ‘येरेगबाळे’ वाटत असतील तर मग तुमच्या समोरच्या खुर्च्या भरणार कशा? बघा, जमलचं तर आत्मपरीक्षण करा, तुमच्या आमदारकीसाठी नाही, पत्रकारितेच्या पावित्र्यासाठी करा… या रिकाम्या खुर्च्या तुम्हाला जे सांगतायत ते कान देऊन ऐका अन जमलच तर व्यापक व्हा…. नेता होणं सोपं असतं, नेता म्हणून टिकून राहण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन चालावं लागतं हेच या रिकाम्या खुर्च्यांच सांगणय.

मुख्य संपादक उपेंद्र कूलकर्णी

Share

One Comment

  1. Wow, fantastic blog format! How lengthy have you been running a blog for?

    you made running a blog glance easy. The entire glance
    of your website is magnificent, let alone the content! You can see similar here sklep internetowy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button