बीड — जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या चार दशकाहून अधिक काळापर्यंत क्षीरसागर घराण्याचा “शब्द”परवलीचा मानला गेला. कार्यकर्त्यांचा राबता हा बंगल्यावर कायम असायचा निवडणुका आल्या की त्याला अक्षरशः भरती यायची मात्र घरात बेकीच राजकारण निर्माण झाल्यामुळे बीडच्या सारीपाटावर या निवडणुकीत मात्र क्षीरसागरांना आतापर्यंत डावललं गेल्याचा चित्र पाहायला मिळतं. भूमिका स्पष्ट नसल्यामुळे जयदत्त क्षीरसागर संधी कोणाकडे मिळते यावर लक्ष ठेवून आहेत. तर संदीप क्षीरसागर एकनिष्ठतेचं फळ मिळेल या आशेवर विसंबून आहेत.योगेश क्षीरसागर देखील अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झोके घेत असल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे. कधी नव्हे ते बंगला अलग थलग पडल्याचं तर दिसतच आहे पण अनेक वावड्या नुसत्याच घोंगावत आहेत.
केशरबाई क्षीरसागर यांच्या काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात बंगल्याच महत्व जयदत्त क्षीरसागर यांच्या पर्यंत कायम राहिल्या गेलं. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात क्षीरसागरांची ताकद कायम राहिली गेली. त्यामुळे त्यांना वजा करून मतदार संघाच गणित मांडणं मी मी म्हणणाऱ्या धुरंधर राजकारण्याला देखील कधीच जमलं नाही. ही बीडची परिस्थिती माहिती असल्यामुळे ते ज्या पक्षात राहिले त्या पक्षाने देखील कधीच क्षीरसागर यांचा उपमर्द होईल अशी कृती होऊ दिली नाही. उलट त्यांना विचारात घेऊनच मतदार संघाची त्यातील उमेदवारांची आखणी केली जायची. प्रशासनावर असलेली मजबूत पकड जनतेशी जोडली गेलेली नाळ यामुळे पराभव स्वीकारावा लागला असला तरी क्षीरसागरांच वलय त्या काळातही तितकच महत्त्वाचं राहिला गेलं. त्यामुळे अडकलेलं प्रत्येक काम हे बंगल्यावर गेलं तर होणारच ही आशा कायम जनतेच्या मनात असायची परिणामी निवडणुका असो अथवा नसो कार्यकर्त्यांसह समर्थकांची गर्दी बंगल्यात पाहायला मिळायची. एवढच की निवडणुकीत त्याला उधाण आलेलं असायचं. हा जवळपास 40 – 45 वर्षाचा इतिहास आहे. मात्र कालाय तस्मै नमः घरातील प्रत्येकाचीच राजकीय महत्त्वकांक्षा जागी झाली अन घराला घरघर लागली. 2019 च्या निवडणुकीत त्याचा परिणाम जाणवला गेला जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्याकडूनच निसटता पराभव स्वीकारावा लागला. तसं काका पुतण्याच्या राजकारणाची समाजकारणाची पद्धती बदलली गेली. यातून बंगल्याचे महत्व कमी होऊ लागलं. जसजसं निवडणूक जवळ येऊ लागली तसं तसं बीडच्या नगरपालिकेवर अधिराज्य गाजवणाऱ्या भारत भूषण क्षीरसागर यांच्या मुलाची राजकीय महत्त्वकांच्या देखील वाढली गेली. त्याने देखील नवे राजकीय डावपेच निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी आखायला सुरुवात केली. त्यामुळे एकाच घरातून विधानसभा उमेदवारीसाठी वेगवेगळ्या पक्षातून का होईना तिघांची दावेदारी केली जाऊ लागली. जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याच्या राजकारणाची बदलती समीकरणे पाहून वेट अँड वॉच असं म्हणत भूमिका स्पष्ट केली नाही.कुठल्याही राजकीय पक्षाशी त्यांनी बांधील की जपली नाही. कदाचित ते पूर्वीच्या आपलं जनतेवर असलेलं वर्चस्व आपल्याला तारुन नेईल. राजकीय पक्ष आपल्याला पायघड्या घालतील अशी अपेक्षा कदाचित त्यांना असावी. ती आता फोल ठरू लागल्याचं दिसू लागला आहे. काहीशी अशीच अवस्था संदीप क्षीरसागर यांची देखील आहे. पक्ष फुटीच ग्रहण लागल्यानंतर शरद पवारांची त्यांनी साथ सोडली नाही. लोकसभा निवडणुकीत मातब्बर समजल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यांचा भावाची साथ मिळवून देखील पराभव करून विजयाची माळ पवारांच्या गळ्यात घालता आली. याच एकनिष्ठतेचा फळ आपल्याला मिळेल असा आशावाद “गृहीत” धरला गेला. राजकारणात “गृहीत”या शब्दाला फारसा अर्थ नसतो. हे मात्र संदीप क्षीरसागर यांना कळालं नाही. राज्याच्या राजकारणात शरद पवारांसारखं व्यक्तिमत्व कधी काय डावपेच अखेल त्यात कोण चित पट होईल हे कुणालाच सांगता आलं नाही. हा इतिहास संदीप क्षीरसागरांना लक्षात राहिला नाही. त्याहूनही वेगळी स्थिती डॉ.योगेश क्षीरसागर यांची आहे. त्यांची मदार सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून आहे. दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला ही जुनी म्हण अजूनही बदलली नाही. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यावर ते विसंबून आहेत. वास्तविक पाहता बीडची जागा शिवसेनेच्या शिंदे गटालाच मिळाली पाहिजे यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटाला जागा सुटली तर योगेश क्षीरसागरांचे भवितव्य अंधारात जाणार आहे. तसंही उमेदवारी मिळाली तरी त्यांचा जनसंपर्क मतदारसंघात कमीच आहे.
एकंदरच क्षीरसागर घराण्याचे तीन मल्ल निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी तेल लावून सज्ज असले तरी वरिष्ठांच्या खेळीने मैदानात उतरण्याआधीच चितपट होतात की काय? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यातील संदीप क्षीरसागर याची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या वावड्या उडत आहेत. तर बीडची जागा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींच्या खेळीत योगेश क्षीरसागरांची कोंडी झाली आहे.तरी बीडच्या राजकारणात महत्त्वाचं राजकीय घराणं समजल्या जाणार क्षीरसागर घराण्यातील प्रत्येक नेता अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलत असल्याचं पाहायला मिळत आहे.