बीड — जिल्ह्यात सगळीकडे अवैध धंदे बोकाळलेले असताना गुन्हेगारीवर आळा घालताना शेपूट घालणारी पोलीस यंत्रणा शेतकऱ्यावर मात्र मर्दानगी दाखवू लागली आहे. बालाघाटावर पवनचक्की कंपन्यांचा धुमाकूळ सुरू असून पोलीस यंत्रणा मावेजा न देता शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची नासाडी करणाऱ्या कंपन्यांना संरक्षण देत कर्तबगार हे दाखवू लागले आहेत. या त्रासाला कंटाळून वैतागलेल्या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्यावरच गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र आत्महत्येची वेळ आणणाऱ्या कंपन्यांचे मात्र पोलीस तळवे चाटत असल्याचे चित्र सुलतानपूर मध्ये पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून बालाघाटावर पवनचक्की कंपन्या धुमाकूळ घालत आहेत. बीडच्या आमदारांसह परळीतून देखील पवनचक्की कंपन्यांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप होत आहे. चौसाळा जवळील सुलतानपूर येथील शेतकऱ्यांना एक रुपया देखील मावेजा न देता त्यांच्या उभ्या पिकातून स्टिंगिंग म्हणजेच तार ओढण्याचा काम ओ टू कंपनीने अक्षरशः पोलीस संरक्षणात सुरू केल आहे. मावेजा मिळाल्यानंतर काम सुरू करा ही मागणी शेतकऱ्यांनी केली असता भाडोत्री गुंड व पोलिसांच्या मदतीने शेतकऱ्यावर दादागिरी आज केली गेली. तार ओढण्याचे सुलतानपुर शिवारातील गट नंबर 247,250,251 मधील
काम थांबत नसल्याने, मावेजा मिळत नसल्याने, उभ्या पिकाचे नुकसान न पाहवल्याने शेतकऱ्याने कंटाळून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. मात्र सुलतानपूरचे शेतकरी पंजाब अनुरथ नाईकवाडे वय 42 वर्ष व त्यांचे वडील अनुरथ नाईकवाडे यांना शासकीय कामात अडथळा आणला व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी चौसाळा पोलीस चौकीत आणले गेले. एरवी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या पोलिसांनी मात्र आम्हाला पोलीस अधीक्षकांचा आदेश आहे त्या आदेशाने आम्ही गुन्हा दाखल करणारच अशी भूमिका घेतली.
पोलिसांसह पवनचक्की कंपन्यांची सुलतानी कधी संपणार?
गेल्या एक ते दीड वर्षापासून पवनचक्की कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक व आमीष दाखवत वेळप्रसंगी दादागिरी करत हे राज्य सुलतानाचं आहे याचा प्रत्यय वारंवार आणून दिला.एरवी एखादा मोठा गुन्हा घडला तर दिरंगाई करणारे पोलीस मात्र या सुलतानांचे पाय चाटत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस संरक्षण न मागता देखील अनेक वेळा पैसा मिळतो म्हणून कंपन्यांच्या गाड्याला संरक्षण दिल्याचे पाहायला मिळाले. राजकीय अभय बीडच्या आमदाराकडून तसेच परळी कडून मिळत असल्याने हे प्रकार होत असल्याचा आरोप वारंवार होऊ लागला असला तरी याचा खंडन मात्र दोघांनीही केलेलं नाही. त्यामुळे या आरोपात तथ्य असल्याचं शेतकरी आता उघड उघड बोलू लागले आहेत.
बारगळ साहेब..! माफियावर कारवाई करताना शेपूट घालणारी पोलीस यंत्रणा इथेच मर्दानगी का दाखवू लागली?
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना वाळू वाहतूक करणारे टिप्पर स्वतःला पकडावे लागले. पोलीस संरक्षणात हे पकडलेले टिप्पर ठेवलेले असताना त्यांना अर्ध्या रात्रीत पाय फुटले. गुन्हेगारीने जिल्ह्यात कळस गाठलेला असताना तुमचे डोळे सावली समजली जाणाऱ्या गुन्हे शाखेचे अधिकारी खुर्च्या उबवित तोंडावर बोट हाताची घडी अशा स्थितीत बसलेले आहेत.गुन्हेगारांनी उच्छाद मांडलेला असताना शेपूट घालणारी तुमची पोलीस यंत्रणा शेतकऱ्यांच्या बाबतीतच मर्दानगी का दाखवू लागली आहे? असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.
शेतकऱ्यावर गुन्हा मग आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे तळवे का चाटता?
मावेजा न मिळाल्यामुळे पवनचक्की दादागिरीला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला असं नेकनूर पोलीस म्हणत आहेत. मग एस पी साहेब ज्यांनी शेतकऱ्यावर आत्मदहनाची वेळ आणली त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले जात नाहीत?त्यांचे तळवे तुमची पोलीस यंत्रणा का चाटत आहे याचंही उत्तर आता शेतकरी मागे लागले आहेत.
पोलिस प्रशासन पवनचक्की कंपन्यांच्या संरक्षणासाठी सर्वात पुढे पिडीत शेतकऱ्यांची जबाबदारी कोणाची?
पवनचक्की कंपन्यांनी बालाघाटावर गेल्या २ वर्षांपासून उच्छाद मांडला असुन शेतकऱ्यांच्या अडाणी पणाचा फायदा घेऊन स्थानिक व बाहेरील गुंड बाळगुन आर्थिक लुट सुरू असुन पोलिस प्रशासनाला हाताशी धरून मनमानी कारभार करत आहेत. बालाघाटावरील शेतकरी पवनचक्की कंपन्यांच्या दहशतीखाली असुन पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली कंपन्यांपुढे लोटांगण घालत असुन शेतकऱ्यांवर दडपशाही करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मग नेमका प्रश्न पडतो पोलिस प्रशासन शेतकऱ्यांसाठी काम करतंय की पवनचक्की कंपन्यांसाठी असा प्रश्न उपस्थित करत मग पिडीत शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी कोणाची?? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे.