Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने बीड जिल्ह्यातील शेती आणि पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. कपाशी, ऊस, तुती आणि सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने गेवराई आणि बीड तालुक्यांतील विविध गावांना भेटी देत पिकांचे नुकसान, जलस्रोतांची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शेतशिवारात जाऊन पाहणी केली. पिकांसाठी केलेला खर्च, पावसाअभावी खुंटलेली वाढ आणि घटलेल्या उत्पादनाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिल्याचे चित्र या दौऱ्यातून समोर आले.

केंद्रीय पथकाने गेवराई तालुक्यातील जातेगाव फाटा, अर्धमसला आणि रानमळा परिसरातील शेतांची पाहणी केली. अर्धमसला येथील सुरेश बाबुराव नरवाडे यांच्या १.४० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाची, तर संतोष बाबुराव नरवाडे यांच्या ०.६७ हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकाची पाहणी करण्यात आली. गेवराई येथील मदन रामभाऊ मोटे यांच्या ०.८० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाच्या नुकसानीचीही माहिती घेण्यात आली.
पावसाचा दीर्घ खंड आणि पाण्याची कमतरता यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. विशेषतः तुतीच्या पिकाला पाण्याअभावी फटका बसल्याने अपेक्षित उत्पादन मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पिके करपल्याने शेतीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे. करपलेल्या पिकांचा जनावरांसाठी चारा म्हणूनही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
गेवराईतील शेतकरी मदन मोटे यांनी पथकासमोर शेती आणि पाणीटंचाईची व्यथा मांडली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस नसल्याने तूर आणि कपाशी पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. विहिरीतील पाणी आटल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःच्या खर्चाने टँकर मागवावा लागत असल्याची परिस्थितीही त्यांनी मांडली.
परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही पाण्याअभावी ऊस पीक जळून गेल्याचे सांगितले. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसणे आणि घरगुती वापरासाठीही टँकरवर अवलंबून राहावे लागणे, यामुळे दुष्काळाचे संकट केवळ पिकांपुरते मर्यादित राहिले नसल्याचे स्पष्ट झाले.
बीड तालुक्यातील पारगाव जप्ती येथे केंद्रीय पथकाने सतीश सखाराम देवळे यांच्या ०.४० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाची पाहणी केली. पावसाच्या खंडामुळे पिकाच्या वाढीवर झालेला परिणाम आणि उत्पादनाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता याची माहिती पथकाने घेतली.
पिकासाठी केलेली मशागत, बियाणे आणि इतर खर्चानंतरही अपेक्षित उत्पन्न मिळेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतशिवारातील पाहणीला दुष्काळी परिस्थितीच्या मूल्यमापनात महत्त्व प्राप्त झाले आहे.
बीड तालुक्यातील नांदुरा हवेली येथे पथकाने सिंदफणा नदीच्या कोरड्या पात्राची पाहणी केली. नदीतील पाणी कमी झाल्याने सिंचन आणि आगामी काळातील पाणी उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी माजलगाव धरणातील पाणीसाठा सरासरीच्या २६ टक्क्यांपर्यंत घसरल्याची माहिती देण्यात आली.
पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय म्हणून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे, बंधारे उभारणे, भूजल पुनर्भरण वाढविणे आणि गाळ साचलेल्या विहिरींचे पुनरुज्जीवन करणे, अशा उपाययोजनांची गरज स्थानिकांनी मांडली. पावसाचे पाणी साठवून त्याचा शेतीसाठी उपयोग वाढविण्यावरही यावेळी भर देण्यात आला.
केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश आहे.
या दौऱ्यात राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित उपस्थित होते.
दोन दिवसीय पाहणी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय पथक बीड तालुक्यातील मांजरसुंबा, खंडाळा, वैद्यकीन्ही, सोनगाव आणि पाटोदा येथे भेट देणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे.
या दौऱ्यातील निरीक्षणांच्या आधारे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यमापन केले जाणार आहे. पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, या पाहणीनंतर शेतकऱ्यांना कोणत्या उपाययोजना आणि मदतीची अपेक्षा पूर्ण होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सध्या बीड जिल्ह्यात दुष्काळाने गंभीर स्वरूप धारण केले असून जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. वाढती पाणीटंचाई आणखी भीषण होत असून जनजीवन विस्कळीत होत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील उग्ररूप धारण करणार आहे.
बीडमध्ये दुष्काळामुळे पाणी पातळी प्रचंड खालावली असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी भीषण परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर मदत करण्यात यावी अशी मागणी केली आहे